Amey Khopkar : सध्या परळ येथील दामोदर नाट्यगृह (Damodar Natyagruha) हे बरचं चर्चेत आहे. गेल्या 100 वर्षांपासून लावणी, नाटक, तमाशा आणि लोककललेची अभिजात परंपरा हे नाट्यगृह जपत आलं. पण मागच्या बऱ्याच काळापासून हे नाट्यगृह पुनर्बांधणीच्या मुद्द्याखाली बंदिस्त झालंय. जवळपास 1 नोव्हेंबर पासून या नाट्यगृहाचा पडदा पुनर्बांधणीच्या नावाखाली बंद करण्यात आलाय.आहे ते नाट्यगृह जमीनदोस्त नाट्यगृह छोटंसं बांधून त्याचा एफएसआय दुसरीकडे वापरण्यात येणार आहे, त्यामुळे कलाकार मंडळींकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. त्यावर आता मनसेकडूनही त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. अमेय खोपरकांनी (Amey Khopkar) ट्वीट करत या सगळ्यावर भाष्य केलंय.
दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी करताना पूर्वी पेक्षा लहान आणि त्या जागेवर दुसरी शाळेची वास्तू उभारली जात आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या चुकीच्या पुनर्बांधणी विरोधात आणि नाट्यगृह मोठं आणि अत्याधुनिक उभाराव, जुन्या संस्थांना, कलाकारांना कार्यालयं द्यावी या मागणीसाठी यापूर्वी सोशल सर्व्हिस लीगने आणि कलाकार मंडळी यांनी आंदोलन केलं होतं. मात्र प्रशासन दाद देत नसल्याने आता कलाकार मंडळी पुन्हा उपोषण करण्याचा तयारीत आहेत.
अमेय खोपकरांचं ट्विट काय?
अमेय खोपकरांनी ट्विट करत म्हटलं की, 'गिरणगावातील दामोदर नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद आहे असा समज होता, पण खरं कारण आता लक्षात आलेलं आहे. ऐतिहासिक असं हे नाट्यगृह जमीनदोस्त करुन तिथे सीबीएसई शाळा उभारण्याचा महापालिकेचा मनसुबा आहे. हा मनसुबा कधीच यशस्वी होऊ देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे. नाट्यगृहाचं आरक्षण हटवून शाळेच्या नावाखाली पैसे ओरबाडण्याचा महापालिकेचा कुटील डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही. कामगार चळवळीचं साक्षीदार असलेलं हे दामोदर नाट्यगृह तेवढ्याच दिमाखात उभं राहणारंच !'
दामोदर नाट्यगृहाबद्दल जाणून घ्या...
परळच्या दामोदर नाट्यगृहात विविध समाजसंस्थांचे कार्यक्रम तसेच नाटकांच्या तालमीदेखील होत असे. लहान-मोठ्या कलाकारांसाठी ते हक्काचं व्यासपीठ होतं. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या अनेक रंगकर्मींच्या कारकिर्दीचं ते उमगस्थान आहे.
मुंबईतील सर्वात जुनं नाट्यगृह म्हणून दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी सोशल सर्विस लीगने 1992 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी केली होती. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या सर्वच कलाकारांनी या नाट्यगृहात आपली कला सादर केली आहे.