Ameesha Patel non-bailable warrant in 11 lakh cheque bounce case: मनोरंजनसृष्टीत सध्या राजपाल यादवच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे खळबळ उडाली. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक फसवणूकप्रकरणी अमिषा कायद्याच्या कचाट्यात सापडलीये. मुरादाबादच्या न्यायालयानं एका जुन्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वारंवार समन्स बजावूनही अमिषा पटेल न्यायालयात गैरहजर होती. याच कारणास्तव न्यायालयानं कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. यावर अमिषा पटेल काय प्रतिक्रिया देते? तिच्यावर काय कारवाई केली जाईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नेमकं प्रकरण काय?
2017 साली मुरादाबाद येथील ड्रीम व्हिजन या इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार यांनी अमिषा पटेलविरोधात तक्रार दाखल केली. एका लग्नसमारंभात तिच्या डान्स परफॉर्मन्सचे आयोजन करण्यात आले होते. तिनं या डान्स परफॉर्मन्ससाठी 11 लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. रक्कम घेऊनही अमिषा पटेल कार्यक्रमात उपस्थित राहिली नाही, असा थेट आरोप इव्हेंट कंपनीच्या मालकाने केला. यानंतर तक्रारदाराने अमिषाकडे दिलेल्या रक्कमेची मागणी केली.
सुरुवातीला अभिनेत्रीनं टाळाटाळ केली. जेव्हा तक्रारदाराकडून सारखी विचारणा केली जात होती, तेव्हा तिनं काही रक्कम परत केली. तर, उर्वरित रक्कम देण्यासाठी तिनं चेक दिला. चेक बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाला. यानंतर तक्रारदाराने थेट न्यायालयात धाव घेतली. तसेच अमिषा पटेलविरोधात तक्रार दाखल केली.
गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी मुरादाबाद न्यायालयात सुरु आहे. न्यायालयाने अनेकदा अमिषाला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अमिषा किंवा तिच्या बाजूने लढणारे वकील कुणीही न्यायालयात हजर राहिले नाहीत. वारंवार समन्स बजावूनही अमिषा पटेल न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मार्च 2026 रोजी मुरादाबाद न्यायालयात होणार आहे. आता या प्रकरणात अमिषा पटेल न्यायालयात हजर होणार का? तिला अटकेला सामोरे जावे लागणार का? हे लवकरच उघड होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या: