Alka kubal on Politics : 'माहेरची साडी' या सिनेमामुळे अभिनेत्री अल्का कुबल (Alka kubal) या अख्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरल्या. त्यानंतर महाराष्ट्राची सून म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. अनेक भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. इतकच नव्हे तर अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आपल्या अभिनयामुळे अल्का कुबल या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. पण सध्या अल्का कुबल या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.
अल्का कुबल यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी राजकारणाविषयीचं त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे माहेरची साडी या सिनेमानंतर त्यांना निवडणूक लढवण्याची ऑफर आल्याचाही खुलासा अल्का कुबल यांनी केला आहे. तसेच राजकारणात येणार का यावरही त्यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. आवडत्या नेत्याविषयीही यावेळी त्यांनी भाष्य केलं आहे.
अल्का कुबल यांना निवडणूक लढवण्याची ऑफर?
ग्रामीण भागीशी जोडलं गेल्याने अल्का कुबल यांनी कधी निवडणूक लढवण्याचा विचार केलाय का? यावर त्यांनी म्हटलं की, 'माहेरची साडी सिनेमानंतर मला निवडणूक लढवण्यासाठी विचारण्यात आलं होतं. मला राजकारण आवडतं, मी प्रचाराच्या सभाही केल्या आहेत. पण आता ते करणार नाही, कारण आताचं राजकारण खूप खालच्या पातळीवर गेलंय. मागच्या टर्मपर्यंत मी खूप प्रचाराच्या सभा करायचे. दिवसाला तीन तीन सभा करायचे, महिला मेळावे करायचे, आताही जाते. पण मला आता ह्याचा प्रचार वैगेरे आवडत नाही कारण राजकारण माझ्या रक्तात नाही. तसही यासाठी गेंड्याची कातडी व्हावं लागतं. तुम्ही फार भावनिक असून चालत नाही. एकतर राजकारणत पडलं तर झोकून देऊन काम करावं लागतं. म्हणजे मला शुटींगही करायचं, महिला मेळावेही करायचे आहेत, असं होत नाही. याच्यात तुम्ही पडलात तर पोहायला शिका आणि पूर्ण ताकदीने उतरायला शिका.'
मी मोदींची प्रचंड मोठी फॅन - अल्का कुबल
आवडत्या नेत्याविषयी अल्का कुबल यांनी म्हटलं की, 'मी फार फॅन आहे मोदींची. त्यांचा उत्साह, त्यांची उर्जा मला प्रचंड आवडते. महाराष्ट्रातील आमच्या महायुतीचे तिनही नेते मला आवडता. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, ही तिघही खूप छान करतायत, बरं वाटतंय. ही तिन्ही मंडळी सगळ्यांना खूप छान वेळ देतायत.' पुढे त्यांनी म्हटलं की, 'सध्याच्या राजकारणामुळे लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. म्हणजे हल्ली असं झालंय, की या पक्षातून त्या पक्षात गेला की त्याला सहज तिकीट मिळतंय. पण तो प्रमाणिकपणा सगळ्यांनीच जपायला हवा.'