Munawar Faruqui : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची शनिवार 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्वीकारली असून याचं कनेक्शन सलमान खानसोबत जोडण्यात आलंय. यानंतर आता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्याही (Munawar Faruqui) जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर मुनव्वरच्या सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आलीये. 


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या चौकशीत ही माहिती समोर आलीये. मुनव्वर सध्या दुबईत असून तो भारतात येताच त्याची सुरक्षा वाढवणार आहेत. दरम्यान या आरोपींनी मुनव्वर दिल्लीत ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याचीही रेकी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर बिष्णोई गँगच्या रडावर असल्याचं सांगण्यात येत आहे. 


बिष्णोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी


बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या हत्येमागे नेमंक कोण? असा प्रश्न महाराष्ट्रासह समस्त देशाला पडला होता. एसआरएच्या प्रकल्पाशी कथित वादामुळे त्यांची हत्या झाली असावी असा दावा काही जण करत होते. मात्र आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदी भाषेत मजकूर टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केली आहे असं बाबा सिद्दिकी यांचं नाव घेऊन सांगितलं आहे.                                                               


बाबा सिद्दिकी यांची हत्या नेमकी का झाली?


मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाली, असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने वा अधिकृत व्यक्तीने माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्या हत्येला एसआरए प्रकल्पाच्या वादाची किनार आहे. दुसरीकडे सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे बिश्नोई गँगशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने तपास करत आहेत. 


ही बातमी वाचा : 


Baba Siddique : बाबा सिद्दीकी प्रकरणात तिसरी अटक, फेसबुक पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर जाळ्यात