Atul Parchure death  : मराठी सिनेसृष्टीतला हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरेंच्या (Atul Parchure) एक्झिटमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. अतुल परचुरे हे मागील वर्षभरापासून कर्करोगाशी झुंजत होते. त्यावर मात करत ते आता सुर्याची पिल्ले या नाटकातून रंगभूमीवर पुन्हा एकदा दमदार कमबॅकही करणार होते. पण त्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अतुल परचुरेंच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


अभिनेते जयवंत वाडकर यांना एबीपी माझासोबत बोलताना अश्रू अनावर झाले. तसेच अशोक सराफ यांनाही या बातमीमुळे मोठा धक्का बसलाय. अतुल परचुरे यांनी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या तितकीच भावते. 


ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही : अशोक सराफ


ही अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता मराठी सिनेसृष्टीने गमावला आहे. ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही. असं व्हायला नको होतं. फार छान नट, फार छान मुलगा होता. माझा अत्यंत जवळचा आणि आवडता मित्र होता. 


जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर


अभिनेते जयवंत वाडकर यांना ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी म्हटलं की,सूर्याची पिल्ले नाटाकाची तालीम सुरु होती.. पाच दिवसांपूर्वी त्याला पुन्हा त्रास होत होता म्हणून अॅडमिट करण्यात आलं. पण तो पुन्हा येईल असं वाटलं होतं. यावर काय बोलावं हेच सुचत नाहीये. नववीत असल्यापासून आम्ही एकत्र काम करतोय. तेव्हापासूनची आमची मैत्री होती. आमचा मित्र खूप लवकर गेलाय.


तुझ्या सारखा पु.लं झाला नाही : वैभव मांगले


वैभव मांगले यांनी अतुल परचुरे यंच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, अतुल मित्रा... मुंबईत आलो तेव्हा तू भेटलास... तू धीर देऊन म्हणालास स्वत:वर विश्वास ठेव आणि काम कर... तेव्हा पासून एक सहृदयता जपली होतीस माझ्या बाबतीत.. खूप प्रेम मिळालं तुझ्याकडून... तुझ्या सारखा पु.लं झाला नाही...




त्याला आम्ही कधीच विसरु शकणार नाही : सचिन पिळगांवकर


अतुल परचुरे सारखा कलाकार आणि मित्र गमवल्याचं दुख: खूपच त्रासदायक आहे त्याला आम्ही कधीच विसरू शकणार नाही, असं म्हणत सचिन पिळगांवकरांनी परचुरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. 
 



ही बातमी वाचा : 


Atul Parchure Death : 'मला आता कसलंच सरप्राईज किंवा ट्रॉमा वाटणार नाही'; अतुल परचुरेंचा दुर्दम्य आशावाद, पण नियतीच्या मनात...