मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित सूत्रधार शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पुण्यातून अटक केली आहे. शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांनी धर्मराज कश्यप आणि शिवानंद या दोघा आरोपींना बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी निवडलं असल्याचा पोलिसांना संशय आहे. 


बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात शुभम लोणकर हादेखील आरोपी असून मुंबई क्राईम ब्रँचकडून त्याचा शोध सुरू आहे. पुण्यात धर्मराज कश्यप आणि शिवानंद हे ज्या भंगाराच्या दुकानात काम करत होते त्या भंगाराच्या दुकानाच्या बाजूलाच प्रवीण लोणकर याच्या मालकीचे दुकान आहे. या हत्येसाठी प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांनी मिळून शिवानंद आणि धर्मराज कश्यप यांना निवडल्याचा संशय पोलिसांना आहे.


लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी घेतली


बाबा सिद्दीकींच्या हत्येबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. शुब्बू लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये, लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं स्पष्ट केलं. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला. 


शुभम लोणकर फरार


या पोस्टची सत्यता मुंबई पोलिसांकडून तपासण्यात येतेय. कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहिवासी आहे. मात्र सध्या त्याचं पुण्यात वास्तव्य आहे.  सिद्दीकी हत्या प्रकरणात शुभमच्या अकाऊटंवरून पोस्ट समोर आल्यानंतर, पोलिस अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावात शुभम लोणकरच्या घरी पोहोचले. मात्र शुभम लोणकरच्या घराला कुलूप लावलेल दिसून आलं. 


शुभम लोणकरला यावर्षी फेब्रुवारीत महाराष्ट्र पोलिसांनी अकोल्यातून अवैध शस्त्रांसह अटक केली होती. तपासात शुभम लोणकरचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगसह असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं पुण्यातून शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली. 


चौथ्या आरोपीची ओळख पटली


दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीचीदेखील ओळख पटली. चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती समोर आली. फरार शिवानंद आणि चौथ्या आरोपीचा तीन राज्यांमध्ये पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध घेण्यात येतोय.


ही बातमी वाचा: