मुंबई : जगविख्यात संगीतकार ए.आर रेहमान याने कधी नव्हे ते वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. मला वाटतं, माझ्याविरोधात मुंबईत एक टोळी कार्यरत आहे असं त्याने सांगितलं खरं. पण त्यानंतर चर्चेला ऊत आला. आजवर ए.आर. रेहमान कधी असं बोलला नव्हता. आपण बरं की आपलं काम बरं अशी त्याची कामाची पद्धत होती. पण असं असतानाही ए.आर रेहमान बोलला. त्यानंतर अनेकांनी त्याची पाठराखण केली. आता या वादात ऑस्कर विजेता साऊंड डिझायनर रसूल पोकुट्टीही उतरला आहे.
ए.आर. रेहमान यांच्या वृत्तपत्रात आलेल्या कात्रणाचा फोटो टाकत ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी रेहमानला पाठिंबा दिला. त्यात ते म्हणाले, तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहीतीय? तुला ऑस्कर मिळणं. ऑस्कर मिळणं म्हणजे बॉलिवूडमध्ये मृत्यू ओढवणं. कारण, तू बॉलिवू़डपेक्षा खूप गुणवान आहेस हेच तू सिद्ध केलंस.
या शेखर कपूर यांच्या ट्विटर रेहमाननेही अत्यंत विनम्रतेनं उत्तर दिलं. तो म्हणतो, पैसा परत येतो. गेलेलं फेम परत मिळतं. पण एकदा हे आयुष्य गेलं तर ते परत मिळत नाही. म्हणून या गोष्टी आता जाऊदेत आपण पुढे जात राहू. यातून रेहमानचा सकारात्मक दृष्टिकोन दिसतो.
हे संभाषण होतं न होतं तोच रसुल पोकुट्टी हा आता या वादात उतरला आहे. रसुल हा 'स्लमडॉग मिलेनिअर' या चित्रपटात साऊंड डिझायनर होता. त्याबद्दल त्याला ऑस्कर मिळालं. त्याने शेखर कपूर यांच्या ट्विटला रिट्विट करत आपला अनुभव मांडला आहे. तो म्हणतो, याबद्दल तुम्ही मला विचारा. मी यामुळे भयंकर नैराश्यातून गेलो आहे. कारण कोणी हिंदी सिनेमावाले मला काम देईनासे झाले. ऑस्कर मिळाल्यानंत माझी स्थिती फार कठिण झाली. अनेक प्रॉडक्शन हाऊसेसनी आम्हाला तुझी गरज नाही असं मला सांगितलं. तरीही ही इंडस्ट्री मला आवडते.
रसूलच्या या ट्विटमुळे मात्र स्थिती गंभीर झाली आहे. ऑस्कर मिळवलेल्या दिग्गजांवर ही वेळ येत असेल हे कुणाच्या गावीही नसेल. मात्र बड्या बॅनर्सची ही मक्तेदारी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
संबंधित बातम्या :