Sulochana Memory With Amitabh Bacchan: मराठी चित्रपटसृष्टीच्या वात्सल्यमूर्ती सुलोचना (Sulochana) दीदी यांनी आज वयाच्या 94 व्या अखेरचा श्वास घेतला. दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुलोचना यांनी चित्रपसृष्टीच्या एका पर्वाचे नेतृत्व करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अनेक दिग्गज मान्यवरांसोबत त्यांनी काम करुन त्यांच्या अभिनयाची कारकिर्द गाजवली आहे. सुलोचना यांनी देवा आनंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन या सुपरस्टारच्या आईची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली. या प्रत्येकासोबत सुलोचना यांचे खास नाते होते, विशेष आठवणी होत्या. त्यातलीच एक आठवण अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या 75 व्या वाढदिवसाची आहे. सुलोचना यांनी अमिताभ यांनी त्यांच्या वाढदिवसाला स्वत:च्या हाताने पत्र लिहून त्यांना आशिर्वाद दिले होते.
जेव्हा दीदींनी बिग बींना पत्र लिहीलं होतं
सुलोचना यांनी अनेक सुपरस्टारसोबत अगदी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. अमिताभ यांच्यासोबत देखील सुलोचना यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण अमिताभ यांच्यासोबत सुलोचना यांची एक विशेष भावनिक आठवण आहे. अमिताभ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सुलोचना दीदींनी स्वत:च्या हाताने पत्र लिहीले होते. तेव्हा अमिताभ यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं होतं. अभिनय क्षेत्रातील या दिग्गज अभिनेत्यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या आठवणी फक्त अमिताभ यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी कायम खास राहतील.
दीदींनी पत्रात काय म्हटलं होतं
सुलोचना यांनी अमिताभ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, 'आज आपला 75 वा वाढदिवस आहे,मराठीमध्ये आम्ही याला 'अमृतमहोत्सव' म्हणतो. तुम्हाला अमृताचा अर्थ तर माहित असेलच. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी अमृताचा आशिर्वाद मिळो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते.' या पत्रात दीदींनी अनेक जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, 'मला अजूनही रेश्मा आणि शेराचा गंभीर, लाजाळू छोटू लक्षात आहे. आज मी त्या लहान मुलाला मोठ्या आणि कणखर झालेले पाहत आहे.' तसेच या पत्रावर दीदींनी स्वत:ची स्वाक्षरी देखील केली होती.
अमिताभ यांनी शेअर केली होती ही आठवण
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरुन हे पत्र शेअर केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, 'सुलोचना जी, ज्यांनी असंख्य चित्रपटांमध्ये माझ्या आईची भूमिका साकारली आहे त्यांनी माझ्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मला दिलेल्या शुभेच्छा या अविस्मरणीय होत्या. त्यांचे शब्द हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. '
सुलोचना यांच्या सहजसुंदर अभिनायाचे प्रेक्षक कायमच चाहते राहिले आहेत. त्यांची अभिनयाबद्दलची आत्मियता, भूमिकेवरचं प्रेम आणि प्रेक्षकांबद्दलची आत्मियता ही कायमच वाखाडण्याजोगी राहणार आहे. त्यांची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या मनातअनंत काळासाठी राहणार आहे या अजिबात संभ्रम नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sulochana: चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन