Ruchira Jadhav New Song : “तिच्या सोबतीने केला आयुष्यातील सुंदर क्षणांचा प्रवास आणि तिच्याविना तळमळत राहिलो त्या क्षणांच्या आठवणीत... अशीच काहीशी गत होते ज्यांचं ब्रेकअप होतं. ती नसली म्हणून आयुष्यच थांबलं का? तिच्या शिवाय आयुष्यात रस उरला नाही का? ‘किस्सा घर प्रॉडक्शन्स’,‘मिडीया वर्क्स स्टुडियो’ यांच्या सहकार्याने प्रेमाच्या महिन्यात #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मयंक पुष्पम सिंह निर्मित आणि विनय प्रतापराव देशमुख दिग्दर्शित ‘चांगली खेळलीस तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप आहे. या गाण्यात अभिनेता विनय प्रतापराव देशमुख आणि ग्लॅमरस अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) यांची जोडी दिसणार आहे. रुचिराने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रुचिराने साकारलेली ‘माया’ची भूमिका लोकप्रिय ठरली. आता या गाण्याच्या माध्यमातून रुचिरा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय, त्यामुळे तिला पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग नक्कीच उत्सुक असणार यात शंका नाही. या गाण्याच्या निमित्ताने रुचिरा, विनय देशमुखसोबत स्क्रिन शेअर करतेय.
विनयने देखील मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, कंटेट क्रिएटर म्हणून काम केले आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या ‘एव्हीके एंटरटेनमेंटने (AVK Entertainment)’ कंपनीने पहिला मराठी सेलिब्रिटी अकापेला सादर केला होता, ज्यामध्ये 66 मराठी कलाकार, 43 मराठीतील गाजलेली गाणी आणि सोबतीला संवाद होते. या गाण्याची संकल्पना विनय प्रतापराव देशमुख यांची होती आणि त्यांनीच या अकापेला व्हिडीयोचे दिग्दर्शन केले होते. मराठी ब्रेकअप रॅप साँग आणि नवीन जोडी लवकरच प्रेक्षकांना अनुभवायाला मिळणार आहे.
‘चांगली खेळलीस तू’ या गाण्याच्या शिर्षकावरुन गाण्याचा विषय नेमका काय आहे, याचा अंदाज प्रेक्षकांना आलाच असेल. पण म्युझिक, गाण्याचे बोल, कलाकारांच्या भूमिकेची झलक, एकंदरीत गाण्याचाही अंदाज आता आला असावा कारण नुकताच या ब्रेकअप रॅपचा टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे.
सध्याच्या तरुण पिढीला रॅप साँगचे फार क्रेझ... मराठीतही रॅप साँग आहेत ज्याच्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे आणि आता प्रेक्षकांसाठीच ब्रेकअप रॅप साँग येतंय ‘चांगली खेळलीस तू’. हे गाणं रॅपर सर्जा याने गायले असून, या गाण्याचे बोल ही त्यानेच लिहिले आहेत. शांप्रद भम्रे यांनी गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. सुमेध कंकाळ हे गाण्याचे असोशिएट प्रोड्युसर आहेत, तर निखिल गुल्हाने हे डिओपी आहेत. “प्रेम कधी होतं की ते कधी नव्हतंच, त्या प्रेमाच्या भावनांचं काय ज्या कायम ख-या होत्या?” ब्रेकअप दरम्यान एखाद्याच्या मनात नेमके काय विचार येतात ते ‘चांगली खेळलीस तू’ या गाण्याच्या माध्यमातून दिसणार आहे.
हेही वाचा :
- Naagin 6 : 'नागिन 6'मध्ये तेजस्वी प्रकाश साकारणार 'ही' भूमिका, तेजस्वीने शेअर केला व्हिडीओ
- Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
- Kajal Aggarwal, Samantha : बॉडी शेमिंग करणाऱ्यांना काजलचं सडेतोड उत्तर; समंथा म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha