मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं समाज भान आपण सगळेच जाणतो. समाजातल्या विविध घटकांना वेळोवेळी विक्रम गोखले यांनी मदत केली आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून त्यांनी हा मदतीचा वसा घेतला आहे. आता सध्या कोरोनाने वेढलेल्या परिस्थितीतही गोखले यांनी दातृत्वाचा धडा घालून दिला आहे. त्यांनी पुण्याजवळच्या नाणे गावातली आपली दोन एकर जागा दोन वेगवेगळ्या संस्थांना दान करत असल्याचं जाहीर केलं आहे.
विक्रम गोखले यांची पुण्याजवळच्या नाणे इथे काही जमीन आहे. त्यातली दोन एकर जागा त्यांनी दोन संस्थांना दिली आहे. पैकी एक एकर जागा सिंटा अर्थात सिनेमा आणि टीव्ही कलाकारांच्या संघटनेला तर एक एकर जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला देण्याचं जाहीर केलं आहे. या जागेवर ज्येष्ठ व निराधार कलाकारांसाठी वृद्धाश्रम काढण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाशी बोलताना विक्रम गोखले म्हणाले, 'कोरोनाच्या काळात सगळेच घटक मदत करत आहेत. ही चांगली बाब आहे. पण ती मदत तात्पुरती आहे. कायमस्वरूपी मदत व्हायला हवी. या कोरोनामुळे अनेकांचा आधार गेला आहे. अनेकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. कित्येक लोक एकटे आहेत. त्यांच्यासाठी या जागेवर आश्रम बांधावा असा प्रस्ताव मी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासमोर ठेवला आहे. त्यांनाही तो प्रकल्प आवडला आहे. याबद्दल माझ्याकडे सर्व प्लॅन तयार असून त्याबद्दल निर्णय घेतले जातील.'
केवळ चित्रपट महामंडळच नव्हे, तर सिंटा म्हणजे सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन यांच्या संघटनेलाही त्यांनी एक एकर जागा दिली आहे. सिंटाचे गोखले हे अध्यक्ष आहेत. याबद्दलही ते म्हणाले, 'मी दोन एकर जागा द्यायची ठरवली होतीच. एक एकर तिकडे दिली तर एक एकर सिंटाला दिली. इथेही कलाकार आहेत. नाणे गावातली रस्त्याजवळची जागा मी त्या दोन्ही संस्थांना दिली आहे. म्हणजे माझा तसा मानस आहे.'
त्यातील अर्धा एकर नाट्यपरिषदेलाही?
चित्रपट महामंडळाला दिलेल्या एक एकरापैकी अर्धा एकर जागा मराठी नाट्यपरिषदेला द्यावी का याबद्दलही विचार सुरू आहे अशी माहीती गोखले यांनी दिली. अर्थात त्याबद्दल गोखले यांचं अद्याप परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी बोलणं झालं नाहीय. सिनेमाप्रमाणे नाट्यसृष्टीतही असे ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांच्यासाठीही काही करावं या हेतूने परिषदेबाबत विचार पुढे आला असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :