शिमला: बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशीरा याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की सनी देओल मागील काही दिवसांपासून कुल्लू जिल्ह्यात राहात होते.
आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी सांगितलं की, जिल्हा मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार सनी देओल आणि त्यांचे मित्र मुंबई जाण्याची तयारी करत होते. मात्र मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
64 वर्षीय अभिनेता सनी देओलची नुकतीच मुंबईमध्ये खांद्याची सर्जरी झाली आहे. त्यानंतर काही दिवस आराम करण्यासाठी ते मनालीमधील आपल्या फार्म हाऊसवर गेले होते. मागील काही दिवसांपासून ते तिथंच थांबलेले होते.
माहितीनुसार, 3 डिसेंबर रोजी सनी देओल मनालीवरुन मुंबईला परत जाणार होते. मुंबई जाण्याआधी त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
हिमाचल प्रदेशात कोविड-19 चे 709 नवीन केसेस समोर आल्यानंतर आता आकडा 41,228 वर पोहोचला आहे. राज्यात मंगळवारी कोरोनामुळं 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये आतापर्यंत कोरोनामुळं मृत झालेल्यांची संख्या 657 झाली आहे.