Kaljayi Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रवास उलगडून सांगणाऱ्या ‘कालजयी सावरकर’ (Kaljayi Savarkar) या लघुपटाची नुकतीच घोषणा झाली होती. आता या लघुपटात आणखी कोणते कलाकार असतील आणि ते कोणत्या भूमिका साकारतील याविषयीचा खुलासाही झाला आहे. हिंदुस्थान एक राष्ट्र म्हणून आणि निवेदक या नात्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट लघुपटातून सांगणार आहे. यामध्ये जेष्ठ हिंदुस्थानची निवेदक म्हणून भूमिका अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) तर, नव्या तरुण भारताची भूमिका अभिनेता तेजस बर्वे (Tejas Barve) साकारत आहे.


लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित असल्याने यामध्ये सावरकरांची भूमिका कोण करणार याविषयी विशेष उत्सुकता होती. आता त्यावरूनही पडदा उठला आहे. अभिनेता सौरभ गोखले (Saurabh Gokhale) हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री पायल गोगटे, अपर्णा चोथे, लिना दातार, ऋता पिंगळे तसेच अभिनेते हृदयनाथ राणे, शंतनू अंबाडेकर, जयोस्तु मेस्त्री, दिनेश कानडे, चिन्मय पाटसकर, हृषीकेश भोसले, पवन वैद्य आणि प्रमोद पवार यांच्या सहयोगी भूमिका आहेत.


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे विविध पैलू आणि अंतरंग उलगडणार!


या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे विविध पैलू आणि अंतरंग उलगडून दाखवण्यात येणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गेली अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रातील एक प्रथितयश नाव म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा गोपी कुकडे यांनी लघुपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या निमित्ताने ते प्रेक्षकांसमोर काहीतरी अनोखं घेऊन येण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. लघुपटाचे लेखन अभिनेत्री आणि लेखिका समीरा गुजर आणि अमोघ पोंक्षे यांनी केले असून, अक्षय जोग यांनी संशोधनासाठी लागणारे सहाय्य केले आहे.


लवकरच सदर लघुपटाचे प्रदर्शन सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात याचे विशेष प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक संस्थांपैकी कोणत्याही संस्थेला जर या लघुपटाचे प्रदर्शन आपल्या गावात किंवा शहरात करायचे असल्यास ते अमोघ पोंक्षे यांच्याशी amogh.parc@gmail.com संपर्क साधू शकतात.


हेही वाचा :


Aathva Rang Premacha : 'आठवा रंग प्रेमाचा' सिनेमातील रिंकू राजगुरुचा लूक रिव्हील; ट्रेलर आऊट


Vikram Box Office Collection : कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई


KK Last Song : 'धूप पानी बहने दे' केके यांचं शेवटचं गाणं रिलीज; चाहते झाले भावूक