Sandeep Nahar Case एकिकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या धक्क्यातून कलाविश्व सावरत नाही, तोच आणखी एका कलाकारानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आणि पुन्हा एकदा कलाविश्वाला हादरा बसला. अभिनेता संदीप नाहर यानं आत्महत्या करत आयुष्य संपवल्याचं कळताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. सदर प्रकरणी मुंबई पोलिसांनी संदीपची पत्नी आणि त्याच्या पत्नीच्या आईविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुंबई मिररनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं.
15 फेब्रुवारीला संदीप हा त्याच्या गोरेगाव येथील फ्लॅटवर मृतावस्थेत आढळला. इथं त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. संदीपला अशा अवस्थेत पाहून त्याती पत्नी आणि मित्रांनी तातडीनं रुग्णालयाची धाव घेतली. जिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर संदीपनं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्यानं फेसबुकवर एक नोटही लिहिली होती, ज्या नोटचा संदर्भ हा त्याची सुसाईड नोट म्हणून घेण्यात येत आहे.
दरम्यान, सदर प्रकरणी मुंबई पोलिसांनी संदीपची पत्नी, सासू आणि सासऱ्यांचा जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर येत आहे.
संदीपनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्यानं पत्नीकडून आपला छळ झाल्याचाही सूर आळवला होता. मुख्य म्हणजे त्याचा हा व्हिडीओ डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 'पत्नीची सततची धमकी आणि तिच्याशी होणाऱ्या भांडणानं आता मी कंटाळलो आहे. तुम्ही कामाचा ताण सहन करु शकता, पण एका महिलेकडून अशा प्रकारे होणारा त्रास तुम्ही सहन करु शकत नाही', असं तो म्हणाला होता. पत्नी आपल्यावर संशय घेत असून कारकिर्द बरबाद करण्याची धमकी देत असल्याची बाब त्याच्या या व्हिडीओनं सर्वांपुढं ठेवली होती.
Sandeep Nahar | अभिनेता संदीप नाहरचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासात अंदाज
हिंदी कलाविश्वात राजकारणाचा सामना
संदीपनं त्याच्या या पोस्टमधून मनातील यातनांना वाट मोकळी करुन दिली होती. हिंदी कलाविश्वातील एका वेगळ्याच प्रकारच्या राजकारणाचा आणि भेदभावाचा सामना केल्याचं त्याच्या या व्हिडीओच्या माध्यमातून उघड झालं होतं.
काही चित्रपटांचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतरही त्याच्याकडून ते प्रस्ताव काढून घेण्यात आले होते. या कलाविश्वात काम करणारी मंडळी ही भावनाविरहित आहेत, असंही तो म्हणाला होता.
केसरी, एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी, यांसारख्या चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर झळकलेल्य़ा या अभिनेत्याचा असा अंत होणं ही बाब अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली.
Sandeep Nahar Case : संदीप नाहरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि पत्नीच्या आईविरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2021 05:57 PM (IST)
एकिकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या धक्क्यातून कलाविश्व सावरत नाही, तोच आणखी एका कलाकारानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -