नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाने पत्रकार प्रिया रामानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. माजी मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अकबर वैयक्तिक अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणाचा निकाल लागला असून यात प्रिया रमानी यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
प्रिया रमानींनी जाणीवपूर्वक आणि चुकीच्या भावनेने आरोप केले आहेत, असा आरोप करत एम. जे. अकबर यांनी करनजावाला अँड कंपनी या लॉ फर्मच्या माध्यमातून पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणारी याचिका दाखल केली होती.
काय आहे प्रकरण?
पत्रकार प्रिया रमानी यांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. एम जे अकबर यांचं पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचं नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.
कोण आहेत प्रिया रमानी?
प्रिया रमानी या मोठ्या कालावधीपासून माध्यमांमध्ये काम करत आहेत. इंडिया टुडे, इंडियन एक्स्प्रेस इत्यादींसोबत त्यांनी काम केले असून, रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेतही त्यांनी काम केले आहे. कॉस्मोपॉलिटन या आंतरराष्ट्रीय फॅशन मॅगझिनच्या प्रिया रमानी या संपादिकाही राहिल्या आहेत. 'मिंट'च्या फीचर संपादकही त्या होत्या. तसेच, प्रकाशन व्यावसायातील प्रसिद्ध अशा 'जगरनॉट'चं संपादकपदही त्यांनी भूषवलंय.