मुंबई: अभिनेता गोविंदा हे मंगळवारी पहाटे बंदुकीची गोळी लागून जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोविंदा यांच्या जुहूतील निवासस्थानी हा प्रकार घडला. ही घटना घडली तेव्हा गोविंदा (Govinda) घरात एकटेच होते. त्यांच्याकडे एक परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. ही रिव्हॉल्व्हर साफ करत असताना ट्रिगर दाबला जाऊन चुकून गोळी सुटली (Govinda Gunfire) आणि ती थेट गोविंदा यांच्या पायात शिरल्याचे सांगितला जाते. या घटनेनंतर संभ्रमाचे वातावरण असताना गोविंदा यांनी मुलगी टीना अहुजा (Tina Ahuja) यांनी 'एबीपी न्यूज'शी संवाद साधून प्रतिक्रिया दिली. टीना अहुजा यांनी गोविंदा यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.


टीना अहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांना सध्या क्रिटी केअर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात (ICU) ठेवण्यात आले आहे. सध्या माझ्या वडिलांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली आहे. पायाला गोळी लागल्यानंतर माझ्या वडिलांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याचे टीना अहुजा यांनी सांगितले.  


डॉक्टरांकडून गोविंदा यांच्या अन्य वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे अहवाल पाहता काळजी करण्याचे कोणते कारण नाही. गोविंदा यांना आणखी 24 तास आयसीयू कक्षात (ICU) ठेवले जाईल. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणा पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. डॉक्टरांचे पथक गोविंदा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले आहे, अशी माहितीही टीना अहुजा यांनी दिली.


नेमकं काय घडलं?


अभिनेता गोविंदा यांच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस कर्मचारी नेहमी तैनात असतात. मात्र, गोविंदा यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी एक परवानाधारक पिस्तुल बाळगले होते. ते पहाटे जुहूतील गोल्डन बीच सोसायटीतील आपल्या घरी हे रिव्हॉल्व्हर साफ करत होते. त्यावेळी रिव्हॉल्व्हरचा खटका दाबला जाऊन गोळी सुटली आणि ती त्यांच्या गुडघ्यात शिरली. गोळी पायात शिरल्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यानंतर गोविंदा यांना जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, गोविंदा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.



आणखी वाचा


अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स


अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी लागली, ICU मध्ये दाखल, तात्काळ शस्त्रक्रिया, सध्या प्रकृती कशी?