सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला  प्रत्येकी  2 जागांवर विजय मिळाला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं  3 तर काँग्रेसनं 1 जागा लढवली होती. सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. महायुतीकडे सध्या 6 आमदार आहेत, तर मविआकडे 2 आमदार आहेत. हे सर्व आमदार पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं या आमदारांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


सातारा जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची यादी 


सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आमदार आहेत.  माणमध्ये जयकुमार गोरे हे देखील भाजपचे आमदार आहेत. शंभूराज देसाई हे शिवसेनेचे आमदार आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सेनेचे महेश शिंदे आमदार आहेत. शंभूराज देसाई आणि महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे वाई आणि दीपक चव्हाण हे फलटण मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत. बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासोबत आहेत. तर, कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत. हे सर्व विद्यमान आमदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 


साताऱ्याचं जागा वाटप कसं होणार? 


महायुतीमध्ये सिटींग गेटींग या सूत्रानुसार जागा वाटप होईल. फलटण, वाई, हे दोन मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असतील. कोरेगाव आणि पाटण हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जातील. तर, सातारा, माण, कराड उत्तर आणि कराड दक्षिण या जागा भाजपकडे जातील, अशी शक्यता आहे. म्हणजेच साताऱ्यात महायुतीत भाजप हाच मोठा भाऊ ठरु शकतो. महायुतीकडे 6 आमदार आहेत ते पुन्हा लढतील. राहिला विषय कराड उत्तरचा तर तिथं मनोज घोरपडे किंवा धैर्यशील कदम यापैकी एकाला संधी मिळेल. तर, कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले हे भाजपकडून लढू शकतात. 


मविआचं जागा वाटप कसं होणार?


महाविकास आघाडीच्या जागा वाटपात साताऱ्यात शरद पवार यांच्या पक्षाचं वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे. कराड दक्षिणला पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत. त्यामुळं ती जागा काँग्रेसकडे राहील. सातारा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्यातरी तुल्यबळ उमेदवार दिसत नसल्यानं तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाऊ शकतो. शरद पवारांच्या पक्षाकडे मतदारसंघ राहिल्यास दीपक पवार पुन्हा रिंगणात असू शकतील किंवा ठाकरेंकडे मतदारसंघ गेल्यास जिल्हाप्रमुख सचिन मोहिते निवडणूक लढवू शकतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित कदम काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागेल. पाटण, फलटण, वाई, माण, कराड उत्तर आणि कोरेगाव हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडे जातील. पाटणमध्ये सत्यजीतसिंह पाटणकर, कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील निवडणूक लढवतील.  फलटण, वाई आणि  माणमधील उमेदवाराच्या नावाबद्दल स्पष्टता आलेली नाही. कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशी लढत होऊ शकते.


इतर बातम्या :


Wai Assembly Seat: वाईत मकरंद पाटील पुन्हा रिंगणात, मदन भोसले की आणखी कोण विरोधात लढणार? लोकसभेला मतदारसंघात काय घडलेलं? मविआ की महायुतीला लीड मिळालेलं?


Karad North : बाळासाहेब पाटील पाच टर्म कराड उत्तरचे आमदार, सहाव्यांदा रिंगणात उतरणार.. भाजपकडून कोण? उत्तर सापडणार?