मुंबई :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दलीप ताहिल (Dalip Tahil) यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या  ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचा निकाल मॅजिस्ट्रेट कोर्टाने सुनावला.  दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी दलीप ताहिल यांना 2 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर दलीप ताहिल यांची तुरुंगात रवानगी झाली असल्याचे वृत्त पसरले होते. त्यावर अभिनेते दलीप ताहिल यांनी एबीपीसोबत बोलताना आपण तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. शिक्षा झाली आहे, हे खरं असलं तरी तुरुंगात असल्याचे वृत्त खोडसाळ असल्याचे त्यांनी म्हटले.  


दलीप ताहिल यांना मद्य प्राशन करून वाहन चालवल्याबद्दल दोन महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी एबीपी न्यूजसोबत खास संवाद साधला. दलीप ताहिल यांनी म्हटले की, मी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करतो. कोर्टाच्या या निर्णयाला मी सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टाने जी शिक्षा सुनावली आहे ती एक suspended sentence आहे. या शिक्षेवर तातडीने अंमलबजावणी होणार असून त्याला स्थगिती आहे. 


वर्ष 2018 मध्ये एक अपघात झाला होता. तो एक किरकोळ अपघात होता. या अपघातात पीडित व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली होती. त्यावेळी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात अपील दाखल करणार असल्याचे दलीप ताहिल यांनी सांगितले. 


मी कोर्टाचा सन्मान करत असून माध्यमांमध्ये तुरुंगवासाबाबत आलेले वृत्त खोडसाळपणाचे असल्याचेही दलीप ताहिल यांनी सांगितले. तुम्ही कार चालवताना मद्य प्राशन केले होते का, असा प्रश्न एबीपी न्यूजने विचारला असता त्यांनी म्हटले की, आम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या प्रत्येक निर्णयाच्या पैलूला सत्र न्यायालयात आव्हान देणार आहोत. 






नेमकं प्रकरण काय?


हे  ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरण 2018 चे 5 वर्षे जुने आहे. जेनिता गांधी आपल्या मित्रासोबत रिक्षाने जात होत्याय त्यावेळी दलीप ताहिल यांच्या गाडीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर दलीप ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अडकल्यामुळे ते पकडले गेले. 'धडक दिल्यावर आम्ही रिक्षातून उतरलो, तेव्हा कार दलीप ताहिल चालवत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही गाडीचा नंबर लिहून घेतला. ताहिल यांनी गाडीबाहेर येऊन वाद घालायला सुरुवात केली आणि माझ्या मित्राला धक्काबुक्की केली.' असं जेनिता गांधींनी जबानीत लिहिलं. या प्रकरणी दलीप ताहिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी अभिनेता दलीप ताहिल यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.  नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी हा खटला सुरूच होता. अशा परिस्थितीत आता या खटल्याचा निकाल आला आहे.