मुंबई :राज्यात वाढीव बिलाचा झटका सामान्य माणसांना सोसावा लागत आहे. याचा फटका सेलिब्रेटींना देखील बसत आहे. अभिनेत्री तापसी पन्नुनंतर आता 'सर्किट' अर्थात अभिनेता अर्शद वारसीला (Actor Arshad Warsi) देखील विजबिलाचा मोठा शॉक बसलाय. एक लाखाहून अधिक बिल आल्याने अर्शद चांगलाच संतापला होता. त्याने ट्वीट करत सरळ अदानींवर निशाणा साधला होता. मात्र त्याने ट्वीट केल्यानंतर तात्काळ अदानी इलेक्ट्रिसिटीकडून दखल घेतल्याने त्याने आपले ट्विट डिलिट केले.

राज्यात अनेक नागरिकांना जवळपास दुप्पट ते तिप्पट बिल आल्याने लोक परेशान आहेत. यासंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली आहेत. अभिनेता अर्शद वारसीला देखील भरमसाठ विजबिल आलं आहे. एक लाख तीन हजार रुपयांचे विजबिल पाहून तो संतापला होता. त्याने ट्वीट करत 'हायवे लुटारु 'अदानी'कडून आलेले हे माझे वीज बिल. आमचे बिल बघून चांगलेच हसू येत आहे. 1,03,564.00 रुपये तुमच्या खात्यातून 5 जुलै 2020 रोजी डेबिट झाले' असे ट्वीट अर्शदने केले होते. विशेष म्हणजे या ट्वीटसोबत अर्शदने अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा हसतानाचा फोटो अर्शदने शेअर केला होता.



दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्याने म्हटलं होतं की, पेंटिंग विकून अदानीचं विज बिल भरायचं आहे. कृपया लोकांनी माझी पेंटिंग विकत घ्यावी. म्हणजे मला पुढील बिल भरायला रक्कम उपयोगात येईल असं त्यानं म्हटलं होतं.

त्याने केलेल्या या ट्विटची दखल तात्काळ घेतली गेली. त्यामुळं नंतर त्याने हे दोन्ही ट्विट डिलिट केली. अदानी इलेक्ट्रिसिटीकडून समस्या सोडवण्यात आली असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 'अंधार असलेल्या बोगद्याच्या शेवटी एक प्रकाश आहे. अदानी अदानी इलेक्ट्रिसिटी तात्काळ प्रतिसाद मिळाला, समस्या सुटली.  आपल्याला फक्त त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे .... धन्यवाद' असं त्यानं म्हटलं आहे.


याआधी बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नूने देखील लॉकडाऊनदरम्यान तिला आलेल्या वीज बिलांवरून नाराजी व्यक्त केली होती. तापसीने ट्वीट करुन तिला आलेले विजेचं बिल शेअर केलं होतं. तापसीने ट्वीट करुन म्हटलं होतं की, "लॉकडाऊनला आता तीन महिने झाले आहेत. मी आता हाच विचार करत आहे की गेल्या महिन्यात मी असं कोणतं विद्युत उपकरण घरात लावलं की माझं वीज बिल एवढं वाढलं." ट्वीट करताना तापसीने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईला टॅग करत विचारलं की, "असं तुम्ही किती चार्ज करता?"

वाढलेलं वीज बिल पाहून तापसी पन्नूला बसला 'शॉक', सोशल मीडियावर शेअर केलं वीज बिल

तापसीने दुसऱ्या एका ट्विटमध्ये लिहिलं होतं की, "हे वीज बिल त्या घरासाठी आहे, जिथे कुणीही राहत नाही. आठवड्यातून फक्त एकदा कुणीतरी तिथे जातं, ते ही साफसफाईसाठी. आता मला ही चिंता आहे की, मला न सांगता तिथे कुणी माझ्या घरात राहत तर ना आणि याची माहिती देण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत तर करत नाही ना." तापसीचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. आता अर्शदच्या ट्विटवर देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत.