बीड : पोलिस दलात वरिष्ठ त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी आपण यापूर्वी ऐकल्या असतील मात्र बीड जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप एका पोलीस निरीक्षकाने थेट पोलीस महासंचालकांकडे केल्याने खळबळ उडाली आहे.

बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या सततच्या त्रासामुळे माझे स्वस्थ खराब झाले आहे. माझी इच्छा असतानाही काम करता येत नसल्याचा आरोप पेरगुलवार यांनी केला आहे.

या तक्रारी अर्जामध्ये पेरगुलवार यांनी पोलीस अधीक्षक पोद्दार हे आपल्याला अर्वाच्च भाषा वापरत असल्याचा उल्लेख केला आहे. बीडचे एसपी हर्ष पोद्दार यांनी पेरगुलवार यांना मतिमंद आहेत म्हणून त्यांना नियंत्रण कक्षात हजर करण्याचे आदेश दिले होते, असेही पेरगुलवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे याची नोंद नियंत्रण कक्ष डायरीलाही केल्याचे पेरगुलवार यांचे म्हणणे आहे.





माझे काही बरे वाईट झाल्यास एसपी जबाबदार - पेरगुलवार
पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांनी पोलीस महासंचाका कडे केलेल्या तक्रारी मध्ये बीडचे एस पी हर्ष पोद्दार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एसपींकडून होणाऱ्या छळामुळे मला स्वेच्छा निवृत्ती द्यावी अशी मागणी मी केली आहे. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी पोलिस अधीक्षक जबाबदार राहितील. तसेच त्यांच्या छळामुळे माझ्या कुटुंबावर  मुलांवरही परिणाम होत आहे. मी याबाबत महासंचालकांशी पत्र व्यवहार केला आहे, असं पेरगुलवार यांनी सांगितलं.

पेरगुलवार यांचा कामात निष्काळजीपणा - हर्ष पोद्दार
पीआय पेरगुलवार यांनी तक्रार केली असल्याबाबतीत माहिती आहे. त्यांच्या कामात ते निष्काळजीपणा करतात. योग्य कारवाई वेळोवेळी केली गेली असल्याची प्रतिक्रिया बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.