मुंबई : मालिकेत एखाद्या कलाकाराची रिप्लेसमेंट होणं आणि रोज दिसणाऱ्या कलाकाराच्या जागी एकदम नवाच चेहरा दिसणं हे आता प्रेक्षकांच्याही सवयीचं झालं आहे. मुळात मालिका एकदा सुरु झाली आणि तिची भट्टी जमली तर ती किमान पाच वर्ष तरी चालते. आजपर्यंत अशा अनेक मालिका ऑनस्क्रिन कुटुंबातील तिसरी पिढी येईपर्यंत सुरु राहिल्या आहेत. मग प्रश्न येतो तो मालिकेतील भूमिकेच्या लोकप्रियतेमुळे मिळणाऱ्या संधी घेत असताता मालिकेला रामराम करण्याचा. अशावेळी काही कलाकार करार न वाढवता मालिका सोडतात आणि त्यांच्या जागी नव्या कलाकाराची वर्णी लागते. साधारणपणे मालिकेतील कलाकार बदलासाठी हे पहिले कारण आहे. त्यानंतर मग कलाकार आणि निर्मात्यांचे वाद, सहकारी कलाकारांमधील मतभेद, भूमिकेला लागणारी कात्री या कारणानेही मालिका सोडणाऱ्या कलाकारांची चर्चा होते.  पण सध्या अशा मालिकेची चर्चा सुरु आहे जी मालिका सुरु होऊन सहा महिने झाले तोपर्यंतच दोन नायिकांनी ही मालिका सोडली आणि लवकरच या मालिकेत तिसरी अभिनेत्री नायिकेच्या रूपात दिसणार आहे. आई माझी काळुबाई या मालिकेतील आर्या हे नायिकेचं पात्र साकारणारी वीणा जगताप मालिकेतून बाहेर पडली असून आता तिच्याजागी रश्मी अनपट काळुबाई भक्त आर्याच्या रूपात झळकणार आहे.


एकेकाळी मराठी सिनेमा गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांची निर्मिती असलेली 'आई माझी काळुबाई' ही मालिका सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्यात आता भर पडली आहे ती मालिका सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांच्या  आतच या मालिकेची मुख्य व्यक्तीरेखा करणारी दुसरी अभिनेत्री वीणा जगताप ही मालिका सोडत असल्याच्या बातमीची. गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन झालं त्यावेळी सुरु असलेल्या मालिकांपासून नव्या मालिकांचं काम थांबलं. अर्थात सगळ्या मनोरंजन क्षेत्रावरच याचा परिणाम झाला. ऑगस्टमध्ये अनलॉक झाल्यानंतर काही निर्बंध घालून मालिकांच्या शूटिंगला परवानगी मिळाली. नव्याने काही मालिकांचे प्रोमो झळकू लागले. यामध्ये आई माझी काळूबाई या मालिकेसाठी सगळी टीम साताऱ्यात दाखल झाली. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या मालिकेचा पहिला भाग प्रसारीत झाला. काहीसा निवळलेला कोरोना सप्टेंबरमध्ये पुन्हा वाढला आणि याचा फटका या मालिकेच्या क्रूला बसला. एकाचवेळी 27 जणांना कोरोनाची लागण झाली. ज्यामध्ये मालिकेत आजीच्या भूमिकेत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना जीव गमवावा लागला. पुन्हा एकदा या मालिकेच्या निर्मात्या म्हणून अलका कुबल यांनी कोरोना नियमावली पाळली की, नाही यावरून प्रश्नांची सरबत्ती झाली. 


मालिका सुरु झाल्यानंतर पंधरा दिवसात सेटवरील 27 जण कोरोनाबाधित  झाल्याने शूटिंग थांबलं. हे संकट ओसरल्यानंतर मालिकेने पकड घेतली खरी पण तोपर्यंत या मालिकेतील नायिका प्राजक्ता गायकवाड हिने सहकलाकारांकडून शिवीगाळ होत असल्याचे तसेच निर्मात्यांकडून पैसे न मिळाल्याची तक्रार करत प्राजक्ता गायकवाडने मालिका सोडली. यावेळीही या मालिकेभोवती चर्चेचे ढग जमले. त्यावेळी तर प्राजक्ता आणि अलका कुबल यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. प्राजक्ताच्या जागी कोण येणार? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आणि त्याचे उत्तर अभिनेत्री वीणा जगतापच्या रूपाने मिळालं. जेमतेम साडेतीन महिने झाले नाहीत तोपर्यत आता वीणानेही ही मालिका सोडत असल्याचं जाहीर केलं तेव्हा पुन्हा काय वाद झाला अशी चर्चा सोशल मीडियासह टीव्ही इंडस्ट्रीत सुरु झाली. पण वीणानेच याचा खुलासा करत, तब्येतीच्या कारणामुळे ही मालिका सोडत असल्याचं सांगितलं आहे. या मालिकेचं शुटिंग सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ सुरु आहे. त्यासाठी कलाकारांना साताऱ्यातच रहावं लागत आहे. तसे करारात नमूद केले आहे. मला साताऱ्यातील हवामानाचा आणि वातावरणाचा त्रास होत असून त्याचा परिणाम तब्येतीवर होत असल्याने मी हा निर्णय घेतला, असं वीणाने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. आता हे कारण किती खरं आणि किती खोटं हे आई काळूबाईलाच ठाऊक.


प्राजक्ताच्या जागी वीणा आली तशी आता वीणाच्या जागी रश्मी दिसणार आहे. रश्मीने यापूर्वी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, अग्निहोत्र भाग दोन, फ्रेशर्स या मालिकांमध्ये काम केलं आहे. लॉकडाऊनमध्ये रश्मीने तिच्या टेरेसवर फुलवलेल्या बागेचे फोटो खूपच व्हायरल झाले होते. वीणाने राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत काम केलं असून बिग बॉसमुळे वीणा अधिक प्रकाशझोतात आली होती. प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत साकारलेली महाराणी येसुबाई ही भूमिका खूपच गाजली होती. मालिकांमधील लोकप्रिय नायिका म्हणून हिट असलेल्या या तिघीजणी सहा महिन्यात एकाच मालिकेच्या नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :