Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवर मागील पाच वर्षांनी 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता पाच वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आई कुठे काय करते मालिकेचं शेवटच्या दिवसाचं शुटींगही नुकतच पार पडलं आहे. त्याचप्रमाणे मालिका ऑफ एअर जाणार असल्याची घोषणा झाल्यापासून कलाकारांच्याही भावनिक प्रतिक्रिया समोर येत आहे. मालिकेच्या शेवटच्या दिवशी यश देशमुख ही भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखची (Abhishek Deshmukh) पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिषेकची पोस्ट नेमकी काय?
अभिनेता अभिषेक देशमुखने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'Good bye यश अरूंधती देशमुख.. आई कुठे काय करतेच्या शुटींगचा शेवटचा दिवस...PACK UP! ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं... 5 वर्षांपासून सोबत असलेलं “कुणीतरी”आता कधीच नसेल किंवा असेल ह्यातली घालमेल घरी येईपर्यंत होती..निघताना भेटीगाठी झाल्या,आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं..कुणाला तरी भेटायचं राहीलंय असं वाटतच होतं..शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो,मेक अप रूम मधे, आरशात बघून आलो..पहील्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो..बॅग जराशी जड वाटत होती..निरोप घेताना ‘मी’ समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की ‘तो’माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक!! त्याच्याकडे पाठ करून निघावसं वाटत नव्हतं.. “मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार..त्यात काय एवढं? ते फक्त काम आहे..” असं शहाण्यांना वाटत असेल..पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं..!'
'आईच्या भोवती फिरणारं यशचं वर्तुळ अखेर पूर्ण झालं'
पुढे त्याने म्हटलं की, ‘यश’ने मला भरभरून प्रेम दिलं..ओळख दिली..अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक,आपलेपणा,आशिर्वाद उर्जा देणारे होते.. टिव्ही या माध्यमाची ताकद काय असू शकते ह्याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते..आईच्या भोवती फिरणारं यशचं वर्तुळ अखेर पूर्ण झालं पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल ह्याची खात्री आहे ... कारण आई मुलाचं/मुलीचं नातं वैश्विक असतं..हे करण्याची मला संधी दिली त्या बद्दल मी आमच्या प्रोजेक्ट हेड आणि लेखिका नमिता वर्तक..ह्यांचा ऋणी असेन..नमिता तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं..
ही बातमी वाचा :
Ketaki Chitale : हिंदुत्वाची लढाई, वोट जिहादचा मुद्दा; मतदानानंतर केतकी चितळेचा व्हिडीओ चर्चेत