Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही सध्या तिच्या वक्तव्यांमुळे बरीच चर्चेत असते. केतकी तिच्या सोशल मीडियावरुन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारे बरेच व्हिडीओ शेअर करत असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर केतकीने तिच्या सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर केला आहे.
केतकीने तिच्या व्हिडीओमध्ये वोट जिहादचाही मुद्दा मांडला आहे. या सगळ्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी आपण लढलं पाहिजे, यासाठी मतदान करण्याचं आवाहनही केतकी केलं. यावर अनेकांच्या कमेंट्सही आल्याचं पाहायला मिळतंय.
केतकी चितळेने काय म्हटलं?
केतकीने तिचा हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'मी माझं मत दान केलंय. ही लढाई हिंदुत्वाची आहे...आपल्याला धर्म वाचवायचा आहे.. जर लव्ह जिहाद होऊ शकतं, वोट जिहाद होऊ शकतं..सरळ म्हणतायत वोट जिहाद...तर मग आपणही लढलं पाहिजे...जय भवानी, जय शिवाजी... हर हर महादेव...'
अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. केतकी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर केतकीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. केतकीने शरद पवार यांच्यावर टीका करणारी एक कविता तिच्या फेसबुकवरुन शेअर केली होती. त्यानंतर केतकी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतं.
कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता श्रेयस तळपदे, शशांक केतकर, सयाजी शिंदे,आदेश बांदेकर यांसह अनेकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता शशांक केतकरने तर त्याचा मतदान केल्याचा फोटो शेअर करत भारतीय जनतेचा जाहीनामाच सांगितला आहे. तसेच अभिनेता श्रेयस तळपदे यानेही एबीपी मझासोबत संवाद साधताना मतदारांच्या मताचा आदर ठेवावा असं आवहन राजकीय नेत्यांना केलं आहे.