Aabhalmaya : मराठीमधली पहिली दैनंदिन मालिका 'आभाळमाया' ला (Aabhalmaya ) नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांनंतरही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. मालिकेची आशयघन कथा, दिग्गज कलाकार मंडळी आणि साधी सरळ मांडणी या सगळ्यामुळे ही मालिका अजरामर झाली. मराठी सिनेसृष्टीत असा एकही कलाकार नसावा जो या मालिकेचा भाग नाही, असं कायम म्हटलं जातं. या मालिकेच्या शीर्षकगातीपासून सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना आजही भावतात. नुकत्याच पार पडलेल्या 'झी मराठी अॅवॉर्ड्सच्या' सोहळ्यातही या मालिकेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 


मालिकेतील सगळ्या कलाकारांनी यावेळी झी मराठी अॅवॉर्ड्सच्या मंचावर हजेरी लावली. इतकच नव्हे तर अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या आवाजात आभाळमायाचं शीर्षकगीतही गायलं. त्यामुळे झी मराठीच्याच मंचावर पुन्हा एकदा एका अजरामर मालिकेचे सूर छेडले गेले. अनेकांच्या डोळ्यात यावेळी अश्रूही पाहायला मिळाले. 


प्रियाने गायलं आभाळमायचं शीर्षकगीत


प्रिया बापट हिनेही आभाळमाया या मालिकेत अगदी छोटी भूमिका साकारली होती. त्या मालिकेपासून प्रियाच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली, असं प्रियाने अनेकदा सांगितलं आहे. इतकच नव्हे तर याच मालिकेच्या सेटवर तिची आणि अभिनेता उमेश कामतची भेट झाली आणि त्यांना आयुष्यभराचे सूर गवसले. त्याच मालिकेचं शीर्षकगीत गाताना उमेशही मंचावर हजर होता.  


मुग्धा गोडबोलेंनी दिला आभाळमायाच्या आठवणींना उजाळा


मुग्धा गोडबोले यांनी नुकतच आभाळमायासाठी पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी म्हटलं की,  आभाळमाया नं काय दिलं.. तर ओळख, अभिमानाने सांगावी अशी एक कायमस्वरुपी आठवण, पुढे अनेक कामं, एक सुसंस्कृत मित्रमंडळ आणि ज्याला ब्ल्यू प्रिंट म्हणावं अश्या एका मालिकेचा भाग असण्याचे भाग्य. आता गणितं बदलली आहेत त्यामुळे आता अश्या मालिका का होत नाहीत असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आता व्यवसाय, अर्थकारण आणि प्रेक्षक सुद्धा बदलले आहेत. पण ह्या गंगेत पावन झालेले आम्ही अजूनही ह्या आठवणीत खूप खूप रमतो. तेव्हा ना टीआरपी होता ना लेखक दिग्दर्शकांवर इतकी बंधनं. पण काहीतरी नक्की होतं ज्यामुळे 25 वर्षानंतरही केवळ त्या एका नावासाठी आम्ही सगळे एकत्र येतो. ती एक बातमी होते. ते काय हे शोधून काढायला हवं. 






ही बातमी वाचा : 


Aabhalmaya : 'अभिमानाने सांगावी अशी एक कायमस्वरुपी आठवण...', 'आभाळमाये'ची 25 वर्ष; अभिनेत्रीची खास पोस्ट