मुंबई : लोकसभेच्या विजयानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.


युवासेना सरचिटणीस वरुण देसाई यांनी इन्स्टाग्रामवरुन  आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत “हीच वेळ आहे, हीच संधी आहे. लक्ष्य - विधानसभा 2019 !! महाराष्ट्र वाट पाहतोय”, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी त्यांनी केली आहे.


यापूर्वीही आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तसेच त्यांच्यासाठी उत्तर मध्य मुंबईतून आणि उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्यासाठी तयारी देखील केली होती.

एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील सक्रिय राजकारणात उतरले असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील लोकसभा लढवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

VIDEO | ज्यांचे उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्त्व नाही, आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला | मुंबई | एबीपी माझा



ठाकरे कुटुंबातून आजपर्यंत कोणीही विधानसभा किंवा लोकसभेची निवडणुक लढवलेली नाही. आदित्य ठाकरे यांनी मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनची निवडणुक जिंकली आहे. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्षपदही सांभाळत आहे. त्यांची तरुण मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे, शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लास रुम, ओपन जिम तसेच मुंबईत स्वच्छ शौचालय ही कामं चांगलीच गाजली आहे.