मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतून युतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकन अर्ज भरण्यापूर्वी शेवाळेंनी आपल्या मतदारसंघातील महत्त्वाच्या धार्मिक आणि पवित्र स्मृतिस्थळांचं दर्शन घेतलं.


राहुल शेवाळे यांनी सकाळी दहा वाजता प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील पवित्र स्मृतीस्थळाला वंदन केलं.

शेवाळेंनी त्यानंतर शिवाजी पार्कातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकालाही त्यांनी भेट दिली. तिथूनच मग काही अंतरावरील माहिम दर्गा इथे जाऊन चादर चढवली. त्यानंतर राहुल शेवाळे हे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ओल्ड कस्टम ऑफिसच्या दिशेने रवाना झाले.

दरम्यान, शिवाजी पार्क इथं 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की गेल्या वेळेपेक्षा यंदाचं आव्हान त्यांच्यासाठी सोप्पं आहे. गेल्या वेळी एक नगरसेवक असूनही ते थेट खासदारकीच्या मैदानात उतरले होते. 2014 च्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसविरोधी लाट होती, त्यामुळे त्यांचं आव्हानं सोप्पं झालं. मात्र गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेलं काम हे त्यांना विजय मिळवून देण्यासाठी पुरेसं असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात लोकांपर्यंत थेट पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

VIDEO | राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे मी राहुल शेवाळेंना साथ देणार : रामदास आठवले | मुंबई | एबीपी माझा