UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये उद्या विधानसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. उद्या 57 जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये सर्वात हॉट सीट म्हणून गोरखपूर मतदारसंघाकडे बघितले जात आहे. कारण येथून खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. या जागेवर योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. योगी आदित्यनाथ हे गोरखनाथ मंदिराचे प्रमुख आहेत. 10 व्या शतकात स्थापन झालेले गोरखनाथ मंदिर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. त्यायामुळे या जागेवरील निवडणूक रंजक ठरणार आहे.
योगी आदित्यनाथ यांना स्थानिक पातळीवर 'महाराज' म्हणून ओळखले जाते. भाजपला या मतदारसंघात मोठे यश मिळणार असल्याचे मत मंदिराचे व्यवस्थापक द्वारका तिवारी यांनी सांगितले. निवडणुकीची वेळ असल्याने मला काही बोलायची गरज नाही. मतदान संपेपर्यंत थांबा. महाराजांशिवाय इथे कोणी नाही असे म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केले आहे. याबाबत स्थानिक व्यापारी रवींद्र ठाकूर म्हणाले, की महाराज असतात तेव्हा दुसरे कोणी नसते. 1998 पासून त्यांनी लोकसभेत गोरखपूरचे पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते विजयी होतील असे ठाकूर यांनी सांगितले.
समाजवादी पार्टीकडून सुभावती शुक्ला
या गोरखपूरच्या जागेवर समाजवादी पार्टीकडून सुभावती शुक्ला या मैदानात उतरल्या आहेत. त्यांचे पती दिवंगत उपेंद्र दत्त शुक्ला हे भाजपचे उपाध्यक्ष होते. त्यांचे आणि योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय कटुता होती. याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 2020 मध्ये जेव्हा शुक्ला यांचे निधन झाले तेव्हा योगी त्यांच्या घरीही गेले नाहीत. यामुळे त्यांचे कुटुंब संतप्त झाले होते. या निवडणुकीत सुभावती ब्राह्मण आणि ठाकूर मतदारांची मते मिळवण्याची शक्यता आहे.
योगी विरुद्ध चंद्रशेखर अशी चर्चा जोरात
भीम आर्मी आणि आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर हेदेखी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या राजवटीत दलितांवर झालेल्या अत्याचारांच्या मुद्यावरुन चंद्रशेखर भाजपवर निशाणा साधत आहेत. दलितांना बळकट करण्यासाठी त्यांच्या मोहिमेचा वापर करत आहेत. पूर्वांचलच्या राजकारणात पाय रोवण्यासाठी आणि देशात दलित नेता म्हणून ओळख मिळवण्यासाठी चंद्रशेखर चतुराईने निवडणुकीचा वापर करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
बसपा आणि काँग्रेसकडून कोण?
बसपने ख्वाजा शमसुद्दीन यांना उमेदवारी दिली आहे. ज्यांना मुस्लिम मते मिळतील अशी शक्यता आहे. तर काँग्रेसकडून योगींच्या विरोधात चेतना पांडे आहेत. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी या जागेसाठी दोरदर प्रचार केला आहे. वेळोवेळी मतदारसंघात ते फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जनता कोणाला कौल देणार हा येणारा काळचं ठरवेल.