मुंबई : भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा अंदाज निवडणूक विश्लेषक आणि स्वराज्य इंडिया पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. देशात भाजप सरकार येणार असून एनडीएला बहुमत मिळणार असल्याचेही ते म्हणाले.


मात्र या निवडणुकीच्या निकालानंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.



यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेसवर देखील टीका केली. काँग्रेस हा भाजपला सक्षम पर्याय नाही. भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही. काँग्रेस सर्वच आघाड्यावर अपयशी ठरली आहे. शेतकरी, बेरोजगारांसाठी काँग्रेस उभी राहिली नाही, असा आरोप यादव यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रात भाजप शिवसेना वरचढ ठरणार असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कमी जागा मिळणार असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 'एक्झिट' पोल 'एक्झॅक्ट' पोल नसतो. मात्र सर्वच पोल एकाच दिशेने जात आहेत. सर्व पोल भाजपचे सरकार येणार असं म्हणत आहेत.  'एक्झिट' पोल करताना त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्यात तथ्य असते, असे ते म्हणाले.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, देशात आधी बूथ कॅप्चरिंग व्हायची, यावेळी पोल कॅप्चरिंग केलं आहे. पूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॅप्चर केली गेली आहे. यासाठी काठ्या, बंदुकी नव्हे तर कॅमेरा आणि टीव्हीच्या माध्यमांचा वापर केला गेला. पूर्ण देशाचे लक्ष्य मुख्य मुद्द्यांवरून भरकटवले गेले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

मतदार समजदार आहे मात्र भाजपने लोकांचा मेंदू कॅप्चर केला. मीडियाच्या माध्यमातून मेंदू कॅप्चर केला गेला. निवडणुकीत भाजपने खूप जास्त पैसे खर्च केले. आपण विचार देखील करू शकणार नाही, इतका पैसा भाजपने खर्च केला आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोगाने संतुलित निष्पक्ष भूमिका बजावली नाही. निवडणूक आयोगाने एकतर्फी भूमिका अवलंबली, असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशात भाजपचे सरकार येईल, मात्र यानंतर देशात गंभीर असेल. दोन मोठ्या समस्या या देशासमोर उभ्या असणार आहेत. पहिली इलेक्टॉरेल ऍथॉरिटीरेनेस म्हणजे निवडणूक जिंकल्यानंतर कुणाचीही ऍथॉरिटी राहणार नाही, अशी भीती आहे. निवडणुकीनंतर देशात लोकशाही नसेल तर तानाशाही असेल. दुसरं म्हणजे देशात बहुमतवाद देखील उफाळून येणार आहे. देशात संविधानिक व्यवस्था कोसळून जाईल, असे ते म्हणाले.

निकालानंतर जनादेशाचा सन्मान करायला हवा. ईव्हीएममधील घोटाळा वगैरे गोष्टी थोतांड आहे. या गोष्टी बदलायच्या असतील तर सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे. देशासमोर मोठे संकट येणार आहे. या संकटाचा सामना कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. देशाला या व्यवस्थेच्या विरोधात मोठी शक्ती निर्माण करावी लागणार आहे, असे यादव म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी काही राज्यांमध्ये भाजप नव्हती. आज त्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दक्षिणेत देखील आज तशी स्थिती आहे, मात्र भविष्यात दक्षिणेतील राज्यातही भाजप असेल. प्रादेशिक पक्षांना भाजप आपल्या ताब्यात घेईल, अशी स्थिती असेल, असेही ते म्हणाले.