कोल्हापूर : वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी सहकुटुंब कोल्हापुरात आंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यावेळी आदित्य ठाकरे कोण आहे? मी त्याला ओळखत नाही, अशा शब्दात बिचुकले यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.


वरळी विधानसभा मतदारसंघातून बिचुकले आणि ठाकरे असा सामना होणार आहे. त्याला आता कुणी रोखू शकत नाही. वरळीत भगवं वादळ दिसतंय यावर बोलताना, असली वादळं अभिजीत बिचुकलेसमोर शून्य आहेत, अशा शब्दात अभिजीत बिचुकलेंनी शिवसेनेवर टीका केली.



साताऱ्यात 20 वर्ष मी छत्रपतींना मान दिला नाही, तर ठाकरे कोण आहेत. साताऱ्यात माझी गादी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी वैचारिक वारसा जपतो. शरीराने जन्म दिला म्हणून वारस होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू-फुलेंचा वारसा मी पुढे नेतोय, असं बिचुकलेंनी सांगितलं.


आदित्य ठाकरे कोण आहेत? ठाकरे कुणामुळे आहेत? जनतेशिवाय ठाकरे शून्य आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघाला ग्लॅमरस रुप माझ्यामुळे आलं, असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला.


गेली अनेक वर्ष मुंबईत शिवसेनेची  सत्ता आहे. सत्तेत असून त्यांनी (ठाकरेंनी) काय केलं जनतेला माहित आहे. त्यामुळे आता मुंबईचा नाही तर महाराष्ट्राचा रिमेट कंट्रोल माझ्या हातात घेणार असल्याचं बिचुकले यांनी सांगितलं.