शरद पवारांनी सभेत सरकारवर निशाणा साधलाच, पण वयावरुन टिप्पणी केलेल्या मंचावरील नेत्यांनाही कोपरखळी मारली. शरद पवार म्हणाले की, "ए वाय पाटील असो, के पी पाटील असो, सतेज पाटील असो ही सगळी मंडळी मनापासून कामाला लागली आहेत. त्याचा मला आनंद आहे. पण त्यांची एक गोष्ट मला आवडली नाही. तिघांनाही सांगतो असं बोलू नका. त्यांनी सांगितलं, 80 वर्षांचा माणूस, आता मी काय म्हातारा झालोय? या राज्यातून शिवसेना-भाजपचं सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी अभी तो मैं जवान हूं. चिंता करण्याचं कारण नाही." शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर सभेत हास्यकल्लोळ झाला.
दरम्यान, राज्यातील जनतेने मला 14 वेळा निवडून दिलं. सात वेळा विधानसभा, सात वेळा लोकसभेत निवडून गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केलं. देशाचा कृषीमंत्री, संरक्षणमंत्री केलं. महाराष्ट्राने मला खूप दिलं आहे. आता चुकीच्या लोकांच्या हातात गेलेला महाराष्ट्र पुन्हा योग्य माणसांच्या हातात देण्यासाठी माझी धडपड सुरु आहे, असंही पवार म्हणाले.