जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे कार्यकर्ते सध्या एकच मागणी घेऊन येत आहेत. निवडणुका असल्याने पवारांना ही असं वाटायचं की एकतर ते स्वतःसाठी किंवा त्यांच्या नेत्यासाठी उमेदवारी मागायला अथवा उमेदवारी का दिली याचं कारण विचारायला आले असावेत. पण प्रत्येक कार्यकर्ता हा खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हेंना तेवढं आमच्या गावात पाठवा, अशी मागणी करत असल्याचं पुण्याच्या जुन्नर येथील उमेदवार अतुल बेनकेसाठी घेतलेल्या सभेत पवारांनी सांगितलं. पवारांनी ही स्तुती केली अन् काही वेळात कोल्हे मंचावर पोहचले. मग काय कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला अन् शरद पवार यांना काही वेळ भाषण थांबवावं लागलं.


शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य पिंजून काढत आहेत. यावेळी सभा संपली की जनता आणि कार्यकर्ते त्यांना गराडा घालतात अन् म्हणतात साहेब एकच काम करा? मी विचारात पडतो? एकतर त्यांना स्वतःला उमेदवारी हवी असेल किंवा त्यांच्या नेत्याला उमेदवारी मागायला अथवा उमेदवारी का दिली नाही याचा ते जाब विचारतील, असं मला वाटायचं. पण ते म्हणायचे तेवढं कोल्हे साहेबांना आमच्याकडे पाठवा. हे ऐकून मी अवाक व्हायचो, असे पवार यावेळी म्हणाले.

शिवरायांच्या भूमीत जन्मलेले कोल्हें कसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेत पहा. मी म्हटलं, भारी आहे राव, जुन्नरकर एकदम लांब गेले आता. नागपूर, नांदेड, कोकण या भागात गेलो की केवळ कोल्हेंनाच मागणी होतेय. आम्हाला जुन्नरी माहित होते, मुंबईत कुठं ही फुलाचं दुकान दिसलं की लोक म्हणायचे जुन्नरीचं दुकान आहे. पण ती पिढी आता गेली.  नव्या पिढीच्या अंतर्कर्णात शिवबाच्या जुन्नरप्रमाणेच कोल्हेंच जुन्नर ही परिचित असल्याचं दिसून आलं. म्हणूनच आज जनता कोल्हेंच मोठ्या मनाने स्वागत करतायेत, अशी स्तुती पवारांनी केली अन ते पुढे बोलू लागले.

तितक्यात कोल्हे मंचाच्या दिशेने आले, अन् कार्यकर्त्यांनी एकच जयघोष सुरु केला. जयघोषानंतर पवार  मंचावर इकडे-तिकडे पाहू लागले. अन स्मित हास्य करत म्हणाले 'कोल्हे आले वाटतं'. कार्यकर्त्यांचा जोश आणि कोल्हेंच्या स्वागताला लागलेलं गीत ऐकून पवारांनी स्वतःचं भाषण थांबवलं. मग कोल्हेंची मंचावर एन्ट्री झाली, चला कोण तरी जुन्नरी आला असं पवारांनी उच्चारलं. तेंव्हा कोल्हेंसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.