याबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. महाराष्ट्रात कोण सत्ता स्थापन करणार? याबाबत खूप शक्यता आहेत. या शक्यतांचा, संभावनांचा विचार करायचा का? याबाबत आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु.
शिवसेनेची आणि आमची विचारसरणी वेगळी आहे. परंतु एकत्र यायचंच असेल तर शिवसेना भाजपपेक्षा बरी. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का नाही? याबाबत विरोधीपक्ष नक्कीच विचार करतील. या केवळ शक्यता आहेत.
पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मतदारसंघातून मोठ्या मतफरकाने निवडून आले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अतुल भोसले यांचा पराभव केला. विजयानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बातचित केली. यावेळी त्यांनी सत्तास्थापनेबाबतच्या शक्यतांबाबत भाष्य केले.
दरम्यान, निकालाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपने विरोधक संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. परंतु ते यशस्वी झाले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आमची माणसं फोडली. साम दाम दंड भेद या नितीचा वापर करुन त्यांनी विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला नवे उमेदवार शोधावे लागले. त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या.
पाहा काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?