पुणे : विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गजांच्या प्रचारतोफा आजपासून धडाडायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीच्या मोठ्या सभेचं नियोजन आजच करण्यात आलंय. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरमधून रणशिंग फुकले आहे. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बारामती मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर, आज पुण्यातील एका सभेत बोलताना शरद पवारांनी (sharad pawar) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra modi) हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातच्याच विकासाचाच विचार करतात, गुजरातशिवाय त्यांना इतर राज्य दिसत नाहीत. म्हणूनच, आपल्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचं सूचवत शरद पवारांनी मोदींवर नाव न घेता हल्लाबोल केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सभांना 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडल्या जाणार आहेत.
माझ्याकडे जेव्हा राज्य होतं तेव्हा मी पुण्याचा विचार केला होता, कारण फक्त शेतीवर सगळं होणार नाही. पण, या सरकारने काय जादू केली माहिती नाही, टाटा एरबसचा कारखाना नागपूरवरुन गुजरातमध्ये नेला. सेमी कंडक्टरचा एक कारखाना ज्याचे नाव वेदांता फॉक्सॉन आहे, हा कारखाना सुद्धा गुजरातमध्ये गेला. जर, एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. इथे महाराष्ट्रात सत्ता बदलायला हवी सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला असा आमदार पाहिजे अधिक लोकांच्या हाताला काम देईल. मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यात खोलात मी आत्ता जात नाही ज्यांच्याकडून झालं नाही त्यांना सुद्धा विश्वासात घेऊ. युगेंद्र यांच्यापाठीशी मी आणि माझे सहकारी उभे राहू, मला काही नको, आमदारकी नको, खासदारकी नको तुमची राहिलेले कामं पूर्ण करायची आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी युगेंद्र पवारांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन सर्व बारामतीकरांना केले आहे.
अजित पवारांना टोला
राज्याचे नेतृत्व कोणीही करेल त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू. काही लोकं सांगतात मी लोकांना सांगेल भावनिक आवाहन करेल, पण त्याची काही गरज नाही. मी माझ्या लोकांना ओळखतो, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला. मला आता आमदारकी नको, खासदारकी नको मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. जर आपल्या विचारांचे सरकार आले तर भक्कमपणे युगेंद्र इथले प्रश्न सोडवेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.