नाशिक : महाराष्ट्रातल्या 28 ते 29 हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. या गावांमधले लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. मग राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सिंचन प्रकल्पांवर खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना विचारला आहे. आज नाशिकमध्ये मनसेची सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, 29 हजार गावांमधील लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार दावा करत आहे की, राज्यात 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या आहेत. इतक्या विहिरी बांधल्या आहेत, तर मग लोकांकडे पिण्यासाठी पाणी का नाही?

UNCUT | नाशिकमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 'राज'बाण, पाहा संपूर्ण भाषण | एबीपी माझा



राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पूर्वीसारखीच आहे, मग सिंचन प्रकल्पावर खर्च केलेले हजारो कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

आजच्या सभेत राज ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्यावरुन सत्ताधारी भाजप-शिवसेनेला प्रश्न विचारले. "2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजप-शिवसेनेने 72 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असल्याची बोंब मारली होती. या घोटाळ्यावरुन भाजपने सत्ताधाऱ्यांवर आणि प्रामुख्याने अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. जर या लोकांनी घोटाळा केला होता, तर सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अजित पवार आणि सुनील तटकरेंवर कारवाई का केली नाही?" असा सवाल अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

वाचा : सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरेंवर भाजपने कारवाई का केली नाही? : राज ठाकरे