काँग्रेसची 'धाकड गर्ल' प्रियांका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेशचंच प्रभारीपद का?
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2019 03:58 PM (IST)
पूर्व उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जागेवर कोण लढणार? कसं लढणार? मुद्दे काय असतील? फोकस कशावर असेल? याचे सर्वाधिकार हे प्रियंका गांधींकडे असतील. पण मुख्य प्रश्न असा की स्वतः प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार का?
फोटो सौजन्य : गेट्टी इमेज
नवी दिल्ली : आणखी एका 'गांधी'ची आज राजकारणात एन्ट्री झाली. नेहरु, इंदिरा ते राजीव-सोनिया असा वारसा लाभलेल्या, स्वतःला सक्रीय राजकारणापासून दूर ठेवलेल्या प्रियांका गांधी-वाड्रा आज काँग्रेसच्या सरचिटणीस झाल्या. पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, की प्रियांका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेशचंच प्रभारीपद का सोपवण्यात आलं आहे? काँग्रेस बॅकफूटवर खेळणार नाही, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ठासून सांगतात ते याचमुळे. प्रियांका यांची राजकारणातली एन्ट्री ही काँग्रेसला उत्तर प्रदेश आणि देशातही फ्रंटफूटवर नेणारी ठरु शकते. पूर्व उत्तर प्रदेश... म्हणजेच काँग्रेसला अपेक्षित असलेल्या सूर्योदयाची दिशा. याच दिशेची जबाबदारी मिळाली प्रियांका गांधींना. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी जवळपास 25 टक्के म्हणजे 26 जागा याच पूर्व उत्तर प्रदेशात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघ याच विभागात येतो. राहुल गांधींचा अमेठी, अयोध्या म्हणजेच आधीचा फैजाबाद मतदारसंघही याच क्षेत्रात येतो. अशा महत्वाच्या विभागाचं प्रभारी पद प्रियांका यांच्याकडे असेल. काँग्रेसची कामगिरी सुधारण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.