मुंबई : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला होता. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केला होता. या प्रकरणाविषयी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे.


या विषयाचं राजकीय भांडवल करणारी मी राजकारणी नाही, मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी एक कन्या आहे, अशा शब्दात मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशा गोष्टींमुळे कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मी स्वतः गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे CBI चौकशीची मागणी केली होती. ती चौकशी पूर्ण झाली आहे. देशातली मोठं मोठी लोकं याची दखल घेतील, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. EVM हॅक होऊ शकत नाहीत हे सिद्ध झालं आहे, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप या हॅकरने केला. 2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा सय्यद शुजाने केला. गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅक केल्याची माहिती होती. मुंडे ही बाब जगजाहीर करण्याच्या भीतीनेच भाजपमधील काही नेत्यांनी त्यांची हत्या घडवून आणली, असा दावा सय्यद शुजाने यावेळी केला.

गोपीनाथ मुंडे यांचं राजधानी दिल्लीत कार अपघातामध्ये निधन झालं होतं. 3 जून 2014 रोजी दिल्ली विमानतळावर जाताना त्यांच्या गाडीला एका वेगवान कारने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडेंना तातडीने 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

कथित हॅकर सय्यद सुजाचा पहिला दावा खोटा

ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करुन खळबळ माजवणारा हॅकर सय्यद शुजाचे काही दावे एबीपी माझाच्या पडताळणीत फोल ठरले आहेत. 13 मे 2014 रोजी हैदराबादमधल्या उप्पलमध्ये भाजप आमदार किशन रेड्डी यांनी 11 लोकांची हत्या केली. या हल्ल्यात आपण थोडक्यात बचावलो, असा दावा कथित हॅकर सैय्यद शुजाने केला होता. मात्र जेव्हा एबीपी माझाची टीम उप्पलमध्ये पोहोचली, तेव्हा हा दावा खोटा असल्याचं उघड झालं.

13 मे 2014 रोजी उप्पलमधील लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेजजवळच्या काकी रेडीच्या गेस्ट हाऊसमध्ये हल्ला झाला होता, असा दावा सय्यद शुजाने केला होता. यानंतर एबीपी माझाच्या टीमने या कॉलेजमध्ये जाऊन आणि आजूबाजूच्या परिसराची पडताळणी केली असता इथे एकही गेस्ट हाऊस नसल्याचं समोर आलं.

एवढंच नाही तर एबीपीच्या टीमने कॉलेज स्टाफ, पेपरविक्रेते, पानविडी दुकानदार आणि काही स्थानिकांशी बातचीत केली. पण इथे कोणतंही गेस्ट हाऊस नसल्याचं सगळ्यांनी सांगितलं. एवढी मोठी घटना घडली, परिसरात गोळीबार झाला तर स्थानिकांना समजणार नाही हे शक्यच नाही, असंही गावकरी म्हणाले. इथे कोणीही घटनेबाबत ऐकलं किंवा पाहिलं नाही. याचाच अर्थ एबीपी माझाच्या पडताळणीत सय्यद सुजाचा दावा खोटा ठरला आहे.

संबंधित बातम्या

ईव्हीएमच्या हॅकिंगचा दावा, सी ग्रेड चित्रपटाची पडेल स्टोरी

EVM सुरक्षित, कायदेशीर कारवाईचा विचार : निवडणूक आयोग

ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, हॅकरचा दावा

कथित हॅकर सय्यद सुजाचा पहिला दावा खोटा