मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापल्यामुळे आज पुन्हा एकदा उघड नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बातचित करत असताना त्यांनी उमेदवारी न मिळणं, मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला मिळालेली उमेदवारी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केले.
एकनाथ खडसे म्हणाले की, मला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर माझ्या कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मीसुद्धा गेले अनेक दिवस पक्षावर नाराज होतो. मी असा काय गुन्हा केला असेल, म्हणून पक्षाने माझं तिकीट नाकारलं, याबाबतच्या कारणांचा मी अजूनही शोध घेतोय. निवडणुकीच्या निकालानंतर मी पक्षश्रेष्ठींशी याबाबत बोलेन.
खडसे म्हणाले की, माझ्याऐवजी माझी मुलगी रोहिणी हिला पक्षाने उमेदवारी दिली आहे. रोहिणीला उमेदवारी देणं हा पक्षाचा निर्णय होता. ती मोठ्या मतफरकाने निवडून येईल. कोणताही कार्यकर्ता निवडून आल्यावर मला त्याचा आनंदच होईल.
पक्षाबाबत बोलताना खडसे म्हणाले की, भाजपचं संघटन मजबूत आहे. राज्यात पुन्हा एकदा आम्ही बहुमताचं सरकार आणू. विधानसभा निवडणुकीत महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. देशानं, राज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. तसेच आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांमुळे आम्हाला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. भारतीय जनता पक्षाला अगदी सहजपणे 135 ते 140 जागा मिळतील.
यावेळी खडसे यांना विचाण्यात आले की, तुमची पक्षावर नाराजी आहे, त्याबाबत तुम्ही कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी चर्चा केलीत का अथवा करणार आहात का? यावर खडसे म्हणाले की, मला त्याबाबत कोणाशीही बोलण्याची गरज भासली नाही. गरज पडल्यास मी वरीष्ठांशी बोलेन.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडण केले. खडसे म्हणाले की, ज्या जमिनीच्या व्यवहारावरुन माझ्यावर आरोप होत आहेत, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मुळात ती वादग्रस्त जमीन सरकारची नाही, एमआयडीसीचीदेखील नाही. तसेच मी कोणतंही नियमबाह्य काम केलेलं नाही.
पक्षाने माझं तिकीट का कापलं? याची कारणं अजूनही शोधतोय : एकनाथ खडसे
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
23 Oct 2019 07:20 PM (IST)
एकनाथ खडसे म्हणाले की, मला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर माझ्या कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मीसुद्धा गेले अनेक दिवस पक्षावर नाराज होतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -