मुंबई : भाजपप्रणित एनडीएच्या  'डिनर डिप्लोमसी'ला शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हजर राहणार आहेत. राजधानीत दिल्लीत आयोजित स्नेहभोजनाला तिघे जण संध्याकाळी रवाना होणार आहेत.


शिवसेनेकडून एनडीएच्या डिनरला कोण जाणार, यावरुन संभ्रमाचं वातावरण होतं. उद्धव ठाकरेंकडून शिवसेना नेत्यांना कोणत्याही सूचना देण्यात न आल्यामुळे डिनरला कोण जाणार, हे निश्चित झालेलं नव्हतं. अखेर सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.

मुंबईत 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकांचं मतदान झाल्यानंतरच उद्धव ठाकरे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर गेले होते. मुंबईत आज  दाखल होताच उद्धव आणि आदित्य ठाकरे हे प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या लग्नासाठी हजर राहिले. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत डिनरला जाणाऱ्या पाहुण्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

Uddhav Thackeray | पूर्वेश प्रताप सरनाईकांच्या विवाहसोहळ्याला उद्धव ठाकरेंची उपस्थिती



भाजपची डिनर डिप्लोमसी

लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या आधी आलेल्या बहुतांश एक्झिक्ट पोलमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्येही एनडीएला बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीए सर्व घटकपक्षांच्या नेत्यांना डिनरसाठी आमंत्रित केलं आहे. या डिनरला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती असून यावेळी आगामी रणनीती ठरवली जाण्याची चिन्हं आहेत.

NDA Dinner Diplomacy | दिल्लीत एनडीएच्या डिनरला कोण जाणार?




भाजपसोबत एनडीएमध्ये असलेले पक्ष

भाजपसोबत एनडीएमध्ये 40 लहान-मोठे पक्ष आहेत. यामधील 9 पक्षांचा मोठा प्रभाव आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. यानंतर जदयू, अण्णा द्रमुक, एआयएडीएमके, पीएमके, डीएमडीके, अकाली दल, लोजप, अपना दल, असम गण परिषद यासह 40 पक्ष एनडीएमध्ये आहेत.