मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक पडणार खिंडार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपा आणि शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा या महिन्याअखेरीस भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यती वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम केल्यामुळे ते नाराज होते. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली तर तो पक्षाला मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे रामराजे निंबाळकर भाजपात जाण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. रामराजे निंबाळकर यांच्या बरोबर त्यांचे जावई राहुल नार्वेकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण देखील भाजपमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे. निंबाळकर भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरु असताना अचानक उदयनराजे देखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेने संभ्रम निर्माण झाला आहे.
दुसरीकडे अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील घराणे देखील भाजपात संपर्कात आहे. पद्मसिंह पाटील यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह भाजपात जाण्याची जोरदार चर्चा असून पुढील काही दिवसात याबाबत घडामोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
छगन भुजबळही शिवसेनेच्या वाटेवर?
शरद पवार यांचे विश्वासू छगन भुजबळ हे सेनेच्या वाटेवर आहेत. शरद पवारांनी रविवारी उडाले ते कावळे ही टिप्पणी केली होती. भुजबळ शिवसेनेत जाणार याची कुणकुण लागल्यानेच शरद पवार यांनी ठाकरी भाषेत भुजबळांच्या पक्ष सोडण्यावर टिपण्णी केली का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीमधील पडझड निवडणुकीच्या तोंडावर सुरूच राहण्याची सध्या चिन्ह आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या