पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपल्या उमेदवार याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. काल(शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून यादी जाहीर केली त्यामध्ये पुण्यातील हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांना तिकीट देण्यात आलं आहे. पुण्यातील या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आलेला होता. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. आता ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी यापुढे पक्षाचं काम करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.


हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार महादेव बाबर निवडणूक लढवण्यास आग्रही आहेत आणि आता बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली, मात्र त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. याबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 


सहा तास थांबलो फक्त 40 सेकंद...


यावेळी बोलताना महादेव बाबर म्हणाले, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. सहा तास थांबलो फक्त 40 सेकंद आम्हाला दिले. उद्धव ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केली आहे. महाविकास आघाडीतून त्यांना एकही जागा पुणे जिल्ह्यासाठी मिळवता आलेली नाही. शिवसेना ही फक्त मुंबई पुरती मर्यादित राहिली आहे. आम्ही सगळे शिवसैनिक नाराज आहोत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म देखील पुण्यात झाला. मात्र, आज एकही जागा आम्हाला पुण्यात मिळत नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


माजी आमदार महादेव बाबर बंडखोरी करणार?


महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच धडा शिकवणार असं म्हणत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यातून हडपसर मतदार संघ महविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर नाराज झाले. तिकीट न मिळाल्याने महादेव बाबर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला. केवळ मीच नाहीतर अख्खा पुणे जिल्हा नाराज आहे. शिवसैनिक नाराज आहेत. जिल्ह्यात अजुन एकही मशालचा उमेदवार दिला नाही मग शिवसैनिकांनी काम कसं करायचं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.


तर पुणे जिल्हयात मशाल कशी पोहोचवावी, पक्ष प्रमुखांना आमचं देणं घेणं नाही हजारो शिवसैनिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं आहे. आमच्याकडून तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच निर्णय घेवू. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार नाही. मी आजपासून शिवसेनेचं काम करणार नाही. संजय राऊत यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले होते की, शरद पवार स्वतः सांगत आहेत की माझं नाव सर्वेत आघाडीवर आहे. संजय राऊत खोटं बोलले. आम्ही मातोश्रीवर 6 तास थांबलो उद्धवसाहेब आम्हाला 40 सेकंद भेटले आणि म्हणाले, प्रयत्न सुरू आहेत आणि निघून गेले. कार्यकर्ते म्हणाले तर नक्की हडपसर मतदारसंघात निवडणूक लढणार म्हणजे लढणार असंही ते म्हणालेत.