नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु आहेत. याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारले असता, राहुल म्हणाले की, "वाराणसीमधील काँग्रेसच्या उमेदवाराबाबत पक्षाने फैसला केला आहे. परंतु त्याबाबत आम्ही काही वेळ सस्पेन्स ठेवणार आहोत."

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वायनाड मतदार संघातील प्रचाराच्या रॅलीदरम्यान प्रियांका म्हणाल्या होत्या की, "काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मला वाराणसीतून निवडणूक लढ असे म्हणाले तर मला खूप आनंद होईल. त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे."

VIDEO | प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार? रॉबर्ट वाड्रा म्हणतात.. | नवी दिल्ली | एबीपी माझा



दरम्यान, मागील आठवड्यात एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा सहभागी झाले होते. या कार्यक्रमात वाड्रांनी प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले होते. तसेच प्रियांका मोदींना जोरदार टक्कर देऊ शकते, असेदेखील वाड्रा म्हणाले होते.

काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यापैकी कोणत्याही पक्षाने वाराणसीतून त्यांचा उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे प्रियांका गांधी विरोधी पक्षांकडून एकमेव उमेदवार म्हणून वाराणसीतून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरु आहे.

VIDEO | प्रियंका गांधी सुंदर, त्यांना चित्रपटात घेतलं असतं, शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाचं वादग्रस्त वक्तव्य | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा