बारामती : "सुप्रिया चांगल्या मताधिक्याने निवडून येईल. बारामतीचा गड 100 टक्के राष्ट्रवादीच राखणार आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. बारामतीमधल्या काटेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील केंद्रावर मतदान केल्यानंतर ते 'एबीपी माझा'शी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात आज 14 मतदारसंघात मतदान होत आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना महायुतीच्या कांचन कुल यांनी आव्हान दिलं आहे.


अजित पवार म्हणाले की, "बारामती विधानसभा क्षेत्राचं टार्गेट एक लाख मताधिक्याचं आहे. यावेळी गाफिल न राहता सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली आहे. हाऊस ते हाऊस प्रचार केला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे सुप्रिया चांगल्या मताधिक्याने निवडून येईल. बारामतीचा गड राष्ट्रवादीच राखणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे."

"बारामती जिंकण सोपं नाही. मनोधैर्य वाढवण्यासाठी भाजपच्या घोषणा सुरु आहे. लवकर उमेदवार न ठरणं तसंच मोदींची इथे सभा न होणं इथेच भाजपचा पराभव झाला आहे," असंही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री बनायला आवडेल
"मला मुख्यमंत्रीपदापर्यंत जायला निश्चितच आवडेल. पण फक्त माझी वाटून काही होणार नाही. त्यासाठी आघाडीने  मॅजिक फीगर ओलांडली पाहिजे. जनतेने ठरवलं तर ती करु शकते. पण मी मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करणार," असं अजित पवारांनी सांगितलं.



महाराष्ट्रात आघाडीचं भरघोस पीक येणार
राज्यात आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी बोलून दाखवला. "लोकसभेचे निकाल येऊ द्या, काय स्थिती असेल ते पाहू. मोदी लाट राहिलेली नाही. भरतीनंतर ओहोटी येते. ओहोटीला सुरुवात झाली आहे. जनता आम्हाला चांगला प्रतिसाद देईल. विधानसभा महत्त्वाची आहे. राज्यातील जनता वैतागली आहे. दुष्काळात सापडलेल्या जनतेला आधार देण्याचं काम आम्ही करु. पावसाळा सुरु झाला की, चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरणार आहोत. मशागत चांगली करणार, चांगल्या पद्धतीने बियाणं पेरणार, पाऊस पडल्यानंतर जे उगवेल, त्यातून ऑक्टोबरमध्ये आघाडीचं भरघोस पीक महाराष्ट्रात येईल, असं अजित पवार म्हणाले.

विजयसिंह मोहित पाटील जायला नको होते
विजयसिंह मोहिते पाटील नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याविषयी अजित पवार म्हणाले की, "विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीतून जायला नको होते. पक्षाच्या स्थापनेपासून ते होते. पवारांनी त्यांच्यावर प्रेम केलं, पदं दिली. शिवाय पवार त्यांना माढ्यातून उमेदवारी देत होते होत, मात्र त्यांनी ती नाकारली. पक्षातून कोणीही जाताना  खंत वाटते. मात्र अशा घटना घडत असतात. नवे कार्यकर्ते आपले करण्याचं काम करणार आहे. वजाबाकी भरुन जास्त बेरीज कशी काढता येईल, याचा प्रयत्न करु."