मुंबई : दादरमधील कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावल्यानंतर, मनसे आक्रमक झाली आहे. "आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, कर नाही त्याला डर कशाला? आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मनसे रस्त्यावर उतरेल," असा इशारा पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसंच भाजपच्या कोणत्याही नेत्याची चौकशी कशी झाली नाही?" असा प्रश्नही त्यांनी विचारला.


संदीप देशपांडे म्हणाले की, "नवी भारताचे नवीन हिटलर जर कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जो तुमची प्रकरणं बाहेर काढेल, जो तुमच्याविरोधात बोलेल, त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. सीबीआय, ईडी भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत आणि या कार्यकर्त्यांशी कसं डील करायचं हे मनसेला माहित आहे."

"राज ठाकरे ईव्हीएमविरोधात जे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याची भाजपला भीती आहे. मागील पाच वर्षात कोणत्या भाजप नेत्याची सीबीआय, ईडी चौकशी झाली का? असा सवाल करत मुंबै बँक, प्रकाश मेहतांचा घोटाळा या कुठल्या प्रकरणात त्यांची चौकशी झाली नसल्याचं देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

तसंच विधानसभेच्या तोंडावर जर अशा नोटीस पाठवल्या जात असतील तर आम्ही त्याला भीक घालत नाही, उलट हा लढा अधिकच तीव्र करु आणि आमचं कुठल्याही प्रकारचं खच्चीकरण होणार नाही. शिवाय आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, कर नाही त्याला डर कशाला? आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मनसे रस्त्यावर उतरेल," असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.

काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

Raj Thackeray Kohinoor | राज ठाकरे कोहिनूर मिल प्रकरणी ईडीच्या रडारवर? | ABP Majha