मुंबई : लोकसभा निवडणुकीलाही उन्हाची झळ बसली आहे. व्हीव्हीपॅट मशीनवर एका मतदानासाठी लागणारा सहा सेकंदांचा वेळ आणि उन्हाळ्याचा विचार करुन निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ दीड तासांनी वाढवली आहे. त्यामुळे मतदारांना सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीत मतदान करता येणार आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होत आहे. महाराष्ट्रात विदर्भातील सात मतदारसंघासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबारमध्ये मतदान पार पडेल. तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.

आतापर्यंत सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. पण यावेळी व्हीव्हीपॅट मशीनमुळे एका मतदानाला सहा सेकंदांचा वेळ लागणार आहे. शिवाय उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी आणि संध्याकाळच्याच सत्रात मतदानाची टक्केवारी वाढते. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सकाळी अर्धा तास, तर संध्याकाळी एक तासाची वेळ वाढवली आहे. नवीन नियमानुसार मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा अशी असेल.

ईव्हीएम हॅकिंगबद्दल निर्माण झालेल्या साशंकतेच्या वातावरणामुळे यंदा लोकसभेच्या निवडणुकीपासून व्हीव्हीपॅट मशीनचा अवलंब केला जाणार आहे. मतदान केल्यानंतर संबंधित उमेदवाराच मत दिलं, याची मतदाराला खात्री व्हावी, यासाठी चिठ्ठी दिसण्याची व्यवस्था व्हीव्हीपॅट मशीनमध्ये करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला सहा सेकंदाचा वेळ लागणार आहे. तसंच मतदारांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनवर लागणारा वेळ लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतदानाचा अवधी दीड तासांनी वाढवला आहे.

VIDEO | जोरदार प्रचार, नागपुरात नितीन गडकरी आणि नाना पटोले आमनेसामने


संबंधित बातम्या

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी

पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान