मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. पण या मतदानावर पावसाचं सावट आहे. कारण, पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागात मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभानानं वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं मतदारांना उद्या मतदान केंद्रावर आणण्याचं मोठं आव्हान सर्वच राजकीय पक्षाचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसमोर आहे.

राज्यात खास करुन मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेनसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशीही शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपुरात चिखलामुळे साहित्य वाटप केंद्रात कर्मचाऱ्यांना त्रास
उद्या होणाऱ्या मतदानासाठी नागपुरात मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर साहित्याचं वाटप सुरू झालं आहे. मात्र काल झालेल्या पावसामुळे साहित्य वाटप केंद्रावर सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. चिखलामुळे साहित्य वाटप केंद्रात कर्मचाऱ्यांना उभं राहून ईव्हीएम आणि इतर साहित्य स्वीकारून त्याची तपासणी करावी लागतेय.

साताऱ्यात चिखलातून वाट काढताना कर्मचाऱ्यांची घसरगुंडी
साताऱ्यातही मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रक्रियेत अडथळे येत आहेत. ज्या ठिकाणी ईव्हीएमचं वाटप करण्यात येणार होतं त्या मंडपात पावसाचं पाणी घुसलं आहे. वाईमध्ये तर पावसामुळे जागोजागी चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. चिखलातून वाट काढताना कर्मचाऱ्यांची घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. सातारा जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकिय यंत्रना सज्ज झाली आहे. मात्र गेल्या चोवीस तासांपासून पडत असलेल्या पावसाने या संपूर्ण प्रक्रियेला अडचणीत आणायला सुरवात केली आहे. ज्या ठिकाणी मतपेट्या वाटप केल जाणार होतं, त्या पेंडालमध्ये पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाईमध्ये मात्र चिखलाच साम्राज्य पहायला मिळत असून या चिखलातून वाट काढताना अनेकांची घसरगुंडी झालेली आहे.