Voter Registration : आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी (Voter Registration Updates) केली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं (Election Commission) दिली आहे. एक जानेवारी, एक एप्रिल ,एक जुलै, आणि एक ऑक्टोबर या तारखांना मतदान नोंदणी करता येणार आहे. नव्या मतदारांना सहज आणि सोप्या पद्धतीनं मतदान नोंदणी करता यावी यासाठी निवडणूक आयोग विशेष मोहीम राबवणार आहे.
यापूर्वी मतदान नोंदणी करण्यासाठी एक जानेवारी ही तारीख असायची म्हणजेच, 1 जानेवारी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्ष पूर्ण केल्या मतदारांना मतदार नोंदणी करणं शक्य होतं. मात्र 2023 पासून आता चार वेळा मतदार नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. एक जानेवारी, एक एप्रिल ,एक जुलै, आणि एक ऑक्टोबर 2023 तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची वयाची 18 वर्षे पूर्ण झाली असतील, त्यांना आता यावर्षी मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
- 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या विशेष मोहिमेंतर्गत 17+ वय असलेला नागरिक आगाऊ मतदार नोंदणी करू शकेल
- 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 दरम्यान निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जात आहे
- 31 मे 2023 पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे.
तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या सहकार्य राज्यभर मतदान नोंदणी शिबीरं राबविण्यात येणार आहेत. याशिवाय मतदार नोंदणी नाव वगळणी तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा वोटर पोर्टल या संकेतस्थळावर आणि वोटर हेल्पलाइन या मोबाईल उपलब्ध असणार आहेत.
निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वाचं असतं. 9 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणं महत्त्वाचं असल्याचंही यावेळी बोलताना देशपांडे यांनी सांगितलं.
यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 19 व 20 नोव्हेंबर आणि 3, 4 डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिरांचं आयोजन करता येणार आहे. महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी 12, 13 नोव्हेंबर रोजी, तर 26, 27 नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि घर नसलेले भटक्या आणि विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरं घेतली जातील. तसेच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP, Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत.