अकोला :  डॉ. विठ्ठल वाघ महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातलं मोठं नाव आहे. डॉ. वाघांच्या साहित्यातून शेती, माती, शेतकरी, ग्रामीण परंपरा आणि संस्कृतीचं यथार्थ चित्रण मांडलं गेलं आहे. वाघांच्या वऱ्हाडी कवितांनी मराठी साहित्यात मैलाचा दगड रोवला आहे. त्यांच्या 'काया मातीत मातीत तिफण चालते' हे कवितेनं तर महाराष्ट्रावर आजही अक्षरश : गारूड घातलेलं आहे.


डॉ. विठ्ठल वाघांच्या लिखाणातून क्वचित प्रसंगीच राजकीय विषय डोकावतात. बरेच दिवसानंतर वाघांच्या 'भात्या'तून राजकीय कवितेचं 'अस्त्र' बाहेर निघालं आहे. अन अस्त्राच्या निशाण्यावर आलेत 'वंचित बहुजन आघाडी'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रिपाई नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. हे दोन्ही नेते सध्या प्रत्येक राजकीय व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करतात. डॉ. वाघांनी या कवितेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांच्या पवारांवरच्या टिकेला उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

डॉ. विठ्ठल वाघ यांची शरद पवारांचे जीवलग मित्र आणि कट्टर समर्थक अशी ओळख आहे. डॉ. विठ्ठल वाघही अनेकदा ते जाहीरपणे बोलून दाखवतात. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात डॉ. वाघांची विधान परिषदेवरची संधी थोडक्यात हुकली होती. मात्र, त्यानंतर या दोन मित्रांमध्ये अंतर पडल्याची चर्चा होती. मात्र, सध्या सर्व पवारविरोधक रोज त्यांना लक्ष्य करीत असताना पवारांच्या बचावासाठी त्यांचा हा जुना सहकारी मैदानात उतरला आहे. डॉ. विठ्ठल वाघ सध्या अमेरिकेत असलेल्या आपल्या मुलाकडे काही महिन्यांसाठी गेलेले आहेत. मात्र, तिथूनही त्यांचं राज्यातल्या राजकीय घडामोडींकडे बारीक लक्ष्य असल्याचं दाखविणारी त्यांची ही राजकीय कविता आहे.

भस्मासूर :

पुराणातल्या साऱ्याच कथा
कपोलकल्पित नसतात.
आजही त्या अवतीभवती
रोज घडत असतात.

वंचितातल्या 'प्रकाशा'ला
अकोल्यातून वाट दिली
ती त्याला सरळसोट
संसदेत घेऊन गेली.

नामांतर घडवलं डंक्यावर,
कुणी छातीला लावली माती
तेही उपकार जाणत नाही
हा नातू कृतघ्न किती.

दलित आहे रामदास आपला,
सांगा कुणा आठवले
हात देऊन त्यालासुद्धा
दिल्लीमध्ये पाठवले.

आता एक अकोला वापरतो
दुसरा विसरतो पंढरपूर,
वर दिला त्या शिवावरच,
हे वार करते भस्मासूर.