मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी आजचा अखेरचा सुपरसंडे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा आणि दिग्गज नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे राज्याच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधीं यांच्या सभांचा धडाका असणार आहे. तर भाजप अध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही झंझावात पहायला मिळणार आहे.


भाजपचे दिग्गज आज मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव आणि भंडाऱ्यातील साकोली येथे सभा घेणार आहेत. तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या राज्यात चार सभा होणार आहेत. शिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील राज्यात प्रचारासाठी येणार आहे. उमरखेड, हिंगोली आणि उदगीर येथे आदित्यनाथ यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

तसेच मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे जाऊन मॉर्निंग वॉक केला. यावेळी त्यांनी  मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी चर्चा देखील केली.

State News | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha



काँग्रेसनेते राहुल गांधी आज पहिल्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज पहिल्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राहुल गांधींची पहिली सभा लातूरच्या औसा येथे होईल. त्यानंतर ते मुंबईतल्या चांदिवली आणि धारावी भागात दोन सभांना संबोधित करणार आहेत. विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधी परदेशी गेल्याने सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसवर निशाणा साधला जात होता. त्यामुळे आता पहिल्यांदाच निवडणूक प्रचारासाठी येणारे राहुल गांधी नेमकी काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्वाचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या राज्यात चार ठिकाणी प्रचारसभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील चार ठिकाणच्या प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. अहमनगरच्या अकोलेत पवारांची पहिली सभा होईल. त्यानंतर ते घनसावंगी, जामनेर आणि चाळीसगावमध्ये प्रचारसभा घेतील.