सांगली : सांगली लोकसभेसाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर लढवणार असल्याची माहिती आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 2 एप्रिलला विशाल पाटील अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा करणार असल्याचं कळतं.


विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. गेल्या 60 वर्षांपासून वसंतदादा पाटील घराण्याची सांगली लोकसभा मतदारसंघावर एकहाती सत्ता आहे.

सांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडूनच लढणार अन्यथा अपक्ष म्हणून लढणार, असा निर्धार विशाल पाटील यांनी केला होता. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाली, त्या बैठकीत विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला तिढा अखेर सुटला आहे.