सिंधुदुर्ग : दिल्लीतील एका प्रतिष्ठित उद्योगपतीने पंतप्रधान कार्यायला मेल करून राणेंनी मंत्रिपद मिळालेल्या खात्याचा बट्ट्याबोळ केला, त्यांच्या पीएने 10 टक्के कमिशन घेतल्याची तक्रार केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राची दखल घेत राणेंचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. नारायण राणेंनी हे खोटं असल्यास त्याचं उत्तर द्यावं असं आव्हान राऊत यांनी दिलं. लोकसभेला जसा भाजपचा सुपडा साफ झाला, तसंच विधानसभेला होणार असून महाविकास आघाडीच्या 180 जागा निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विनायक राऊत हे कुडाळमध्ये बोलत होते.
नारायण राणेंवर टीका करताना विनायक राऊत म्हणाले की, "इटूकली, बिटूकली, पुटूकली राणेंची काय औकात? राणे तुमची औकात काय? उद्धव ठाकरेंना धमकी देणं सोडून द्या. आज बाळासाहेब असते तर गोळ्या घातल्या असं म्हणणाऱ्या नारोबाची बाळासाहेबांनी हकालपट्टी केली. राणेनी शिवसेना संपवणार असं म्हटलं होत. त्याच राणेंना 2024 साली मुलाच्या प्रचारासाठी धनुष्यबाण घेऊन दारोदार फिरावं लागतं. राणेंचा पराभव करण्याचा इतिहास या कुडाळ मालवणमध्ये घडला. त्याच राणेंच्या मुलाचा, निलेश राणे यांचा पराभव करायची संधी पुन्हा एकदा वैभव नाईक यांना मिळाली आहे."
चिपी विमानतळ का बंद पडले ते राणेंनी सांगावं
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेचा पैसा लुबाडण्याचं काम सुरू आहे असा आरोप विनायक राऊत यांनी केला. चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र चिपी विमानतळ बंद का याचं उत्तर नारायण राणे यांनी द्यावं. राणेंना चिपी विमानतळ बंद झालं याचा थांग पत्ता लागला नाही. ते विमानतळ पुन्हा मी सुरू करणार. राणेंना त्या विमानतळावरून यायचं नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना इथून यायचं आहे असं विनायक राऊत म्हणाले.
दीड हजार देऊन आमच्या भगिनीची चेष्ठा करता. आमची सत्ता आल्यास आम्ही पंचसूत्री मधून भगिनींना 3000 रुपये देणार. 65 वर्षांवरील नागरिकांना दरमहा सहा हजार रुपये देणार असं राऊत म्हणाले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिलांना मोफत बस सेवा, 25 हजार महिलांची पोलीस भरती करणार असं आश्वासन राऊत यांनी दिलं. महायुतीच्या सरकारने सांगावं कोकणातील शेतकऱ्यांना बोनस दिला का? असा प्रश्न त्यांनी केला.
मालवणमध्ये 13 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची सभा आहे. याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यामुळेच आम्ही मालवणला सभा घेतोय असं विनायक राऊत म्हणाले.
ही बातमी वाचा: