पुणे: लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेऊन सुनेत्रा पवार यांना मदत करणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याविरोधात अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी झेंडे (Sambhaji Zende) हे पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यासमोर दंड थोपटून उभे राहिले आहेत. त्यामुळे लोकसभेला मदत करुनही अजित पवारांनी पुरंदरमधून शिवतारेंविरोधात उमेदवार कसा दिला, असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आता विजय शिवतारे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विजय शिवतारे यांनी अजितदादांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या वचनाची आठवण करुन दिली. तसेच संभाजी झेंडे यांना पुरंदरमधून रिंगणात उतरवण्याच्या अजितदादांच्या निर्णयावर विजय शिवतारे यांनी टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात ज्याने सुनेत्रा पवारांना पडण्याचा प्रयत्न केला त्याला अजितदादांनी तिकीट दिले, याबाबत मला आश्चर्य वाटते. पुरंदर हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर संभाजी झेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजी झेंडे यांनी सुनेत्रा पवारांना पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यांना उमेदवारी दिली ही वैचारिक दिवाळखोरी आहे, असे मत विजय शिवतारे व्यक्त केले.
जेव्हा मी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही नेत्यांसमोर शब्द दिला होता की पुरंदरचा किल्लेदार विधानसभामध्ये पाठवा. तरीदेखील अशा पध्दतीने संभाजी झेंडे यांची उमेदवारी का जाहीर केली? निष्ठावान राष्ट्रवादीच्या नेत्याला संधी दिली असती तरी मला चालले असते. पण ज्यांनी सुनेत्रा पवारांना पडण्यासाठी ज्याने प्रयत्न केला त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला? असा सवाल शिवतारे यांनी उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकीत अजितदादांकडून शिवतारेंची मनधरणी
विजय शिवतारे यांचा पुरंदर मतदारसंघ बारामती लोकसभेत येतो. लोकसभा निवडणुकीला सुनेत्रा पवार या बारामतीमधून उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी विजय शिवतारे यांनाही निवडणूक लढवायची होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर विजय शिवतारे यांनी बंड मागे घेत बारामती लोकसभेच्या लढाईत सुनेत्रा पवारांना मदत करण्याचे मान्य केले होते.
आणखी वाचा
बारामतीची जागा अपक्ष म्हणून 1 हजार टक्के जिंकली असती : विजय शिवतारे
लोकसभेला तह केला, पण विधानसभेला पुरंदरमध्ये विजय शिवतारेंविरोधात अजितदादा गटाचा उमेदवार रिंगणात